समाजाने समाजासाठी निर्माण केलेला सांस्कृतिक सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 12:55 AM2019-07-04T00:55:37+5:302019-07-04T00:56:24+5:30
आषाढी वारी ही महाराष्ट्राची प्रसिद्ध परंपरा आहे़ कित्येक काळापासून ही परंपरा सुरू आहे़ संत म्हणतात, ‘आम्हा सापडले वर्म, करू स्थापन भागवत धर्म’ या वचनानुसार संत ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम आदी संतांनी वारकरी संप्रदायाचे सर्वसमावेशक असे धर्म मंदिर उभारले आणि विठ्ठलनामाची कीर्ती पताका जगभर फडकविण्याची किमया केली़
आषाढी वारी ही महाराष्ट्राची प्रसिद्ध परंपरा आहे़ कित्येक काळापासून ही परंपरा सुरू आहे़ संत म्हणतात, ‘आम्हा सापडले वर्म, करू स्थापन भागवत धर्म’ या वचनानुसार संत ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम आदी संतांनी वारकरी संप्रदायाचे सर्वसमावेशक असे धर्म मंदिर उभारले आणि विठ्ठलनामाची कीर्ती पताका जगभर फडकविण्याची किमया केली़ कित्येक शतकांपासून सामाजिक परिस्थितीत बदल होत गेले़; परंतु वारी करण्याची वारकऱ्यांची परंपरा अखंडितपणे सुरू आहे़ वारीला जाणारा वारकरी हा मुळात विठोबाला भेटण्यासाठी उत्सुक असतो़ त्यातही आपल्या जिवाची पर्वा न करता, सुख-दु:खाचा विचार न करता एकनिष्ठेने वारीत चालत राहतो़ त्याची वारी तो विसरत नाही़ कारण वारी हा सामुदायिक भक्तीचा सर्वमान्य संकेत आहे़ वारी हा समाजाने समाजासाठी निर्माण केलेला एक सांस्कृतिक सोहळा आहे़ वारीतून आत्मजाणिवा स्वच्छ होतात़़, असा माझा अनुभव आहे़ जगण्याचे व्यवस्थापन कसे असते ते वारीतून कळते़ तसेच मन ताजेतवाणे होते़ जगण्याची सद्वृत्ती आणि निसर्गाचे भान वारीतून येते़ वारी हा वारकऱ्यांचा प्राण आहे़ पंढरपूर हे वारकºयांचे आद्यपीठ आहे़ वारकरी ज्या विठ्ठलाच्या भेटीला जातो तो विठ्ठल आनंदाची रास असतो़ एकदा विठ्ठलाचे रूप पाहिले आणि विठ्ठलाच्या चरणावर डोेके ठेवले की वारकरी आनंदात डुंबून जातो़ त्याच्या डोळ्याचे पारणे फिटते़ विठ्ठल दर्शनामुळे त्याचा जीवभाव विरून जातो़ ‘डोळियांचे दैव आजि उभे केले। निधान देखिले पंढरीचे ।’ अशी त्याची स्थिती होते़
साधारणत: बाराव्या शतकापासून वारीला महत्त्व प्राप्त झाले. या वारीसंबंधी संत ज्ञानदेव, संत निवृत्तिनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई यांनी विशेष महिमा वर्णन केला आहे. संत ज्ञानदेव म्हणतात, ‘माझे जीवीची आवडी । पंढरपूर नेईन गुढी ।’, त्याप्रमाणे संत चोखोबा महाराज यांनीदेखील पंढरीच्या वारीचे वर्णन केले आहे. सकल संतांनी आपल्या वाङ्मयात पंढरपूरप्रमाणेच वारीचादेखील वेगवेगळ्या ठिकाणी उल्लेख केलेला दिसून येतो. वारकरी संप्रदायात आध्यात्माविषयी उदार दृष्टिकोन असल्याने त्याचा परिणाम महाराष्टÑातील जनमनावर झालेला दिसून येतो.
वारकरी संप्रदायात वारीचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. पंढरीची वारी वर्षातून चार वेळा येते. आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री अशा चार वेळा वारीला जाण्याची प्रथा आहे. त्यात आषाढी वारीचे महत्त्व अधिक आहे. कारण हिंदू धर्मात आणि वारकरी संप्रदायात आषाढ-श्रावण या महिन्याला धार्मिक, आध्यात्मिकदृष्ट्या अधिक महत्त्व आहे. आषाढी वारीला जाण्यासाठी महाराष्टÑाच्या कानाकोपºयातील भाविक वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो. अन्य सण -उत्सवालादेखील पंढरपुरात गर्दी असते; परंतु आषाढी वारीला होणारी गर्दी ही लक्षणीय असते. लाखो वारकºयांची पंढरपुरात होणारी ही मांदियाळी अलौकिक असते. हा अनुभव मी गेली अनेक वर्षे घेत आहे. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या देहू-आळंदी येथून निघतात. त्याच्याही काही दिवस आधी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ यांची पालखी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघते. सात मानाच्या पालख्यांमध्ये या पालखीचा समावेश असतो. या पालखीसोबत दिंड्यांमध्ये वारकºयांची संख्या जास्त असते. तसेच लांबचा प्रवास असल्याने मुक्कामाची ठिकाणेही जास्त असतात.
संत तुकाराम महाराजांनी पंढरपूरचे आध्यात्मिकरीतीने वर्णन केले आहे़ त्यांनी सांगितले की, आतील आत्म्यातून पांडुरंगाचे दर्शन होते ही जाणीव वारीतून मिळते़ आत्मसुखाचा बोध होतो़ सर्वात्मक भावाचा अनुभव येतो़ आत्मस्वरूपाची ओळख होते़ माणूसपणाचे भान या वारीमुळे येते आणि ऐक्याचे दर्शन घडते़ म्हणून जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा ही वारकºयांची श्रद्धा आहे़
- डॉ़ तुळशीराम गुट्टे महाराज, लेखक संत साहित्याचे अभ्यासक आहेत.