वन्य प्राणी शहरात आल्यास संचारबंदी लावणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:40 AM2020-12-11T04:40:49+5:302020-12-11T04:40:49+5:30

नाशिक : पुणे शहरात शिरलेल्या रानगव्याचा तेथील नागरिकांच्या असंवेदनशीलतेने मृत्यू झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर ...

A curfew will be imposed if wild animals enter the city! | वन्य प्राणी शहरात आल्यास संचारबंदी लावणार!

वन्य प्राणी शहरात आल्यास संचारबंदी लावणार!

Next

नाशिक : पुणे शहरात शिरलेल्या रानगव्याचा तेथील नागरिकांच्या असंवेदनशीलतेने मृत्यू झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा चर्चिला जात असून, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी वन्य प्राणी शहरात शिरल्यास त्या परिसरात तातडीने संचारबंदी लागू केली जाईल, असे जाहीर केले आहे. वन्य प्राण्याची सुरक्षितता आणि वन विभागाला त्यांचे काम पार पाडता यावे, यासाठी निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पुणे येथे वाट चुकलेला रानगवा पुणे शहरात शिरल्यानंतर नागरिकांच्या हिंसक प्रवृत्तीमुळे रानगवा जखमी झाला हाेता. वन विभागाने त्यास बेशुद्ध करून ताब्यात घेतल्यानंतर काही वेळातचा त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर वन्यजिवप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासनाने एखादा प्राणी शहरात घुसला तर त्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी तातडीने संचारबंदी लावण्यात येईल, असा निर्णय घेतला आहे. नागरिकांच्या गर्दीमुळे वन्यजीवाचा बळी जाऊ नये, यासाठी निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे शहरात गवा घुसल्यानंतर त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गर्दीमुळे गवा बिथरला. काही नागरिकांनी लाठ्याकाठ्यांनी त्यावर हल्ला केला. यात तो जखमी होऊन मरण पावला. घटनेची दखल नाशिक जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. प्राणी शहरात शिरल्यास गर्दी होऊ नये, वन विभाग, पोलिसांना त्यांचे काम करता यावे, यासाठी संचारबंदी लागू केली जाईल. संचार बंदीचे उल्लघंन करून गर्दी केल्यास दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया

जिल्ह्यात रहिवासी क्षेत्रात प्राणी शिरल्यास त्याला सुरक्षित रेस्क्यू करण्यासाठी संचारबंदी लावण्यात येईल. गर्दी होऊ नये, तसेच वन विभागाचे काम सोपे व्हावे, हा या मागचा उद्देश आहे. नागरिकांनी विनाकारण हिंसक कृत्य करू नये. नियम तोडल्यास गुन्हे दाखल केले जातील.

- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.

Web Title: A curfew will be imposed if wild animals enter the city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.