दादा भुसे यांची हॅट्ट्रिक
By admin | Published: October 19, 2014 10:23 PM2014-10-19T22:23:46+5:302014-10-20T00:11:23+5:30
दादा भुसे यांची हॅट्ट्रिक
मालेगाव : मालेगाव बाह्य येथील मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या दादा भुसे यांनी विजयाची हॅट्ट्रिक करत तिसऱ्यांदा विजयी पताका फडकावली. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपाचे पवन ठाकरे यांना ३७ हजार ४२१ मतांनी पराभूत केले. दादा भुसे यांना ८२ हजार ९३, तर पवन ठाकरे यांना ४४ हजार ६७२ मते मिळाली.
येथील ऐश्वर्या मंगल कार्यालयात सकाळी ८ वाजेला मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीत भुसे यांना ४११६ मते, तर ठाकरे यांना २००१ मते मिळाली. यात त्यांनी घेतलेली आघाडी २११५ मतांची घेतली होती. अखेरच्या फेरीपर्यंत आघाडी वाढत गेली. भुसे यांनी प्रत्येक फेरीत इतर उमेदवारांपेक्षा पाचशे ते २००० मतांची आघाडी घेत विजयश्री खेचून आणली. मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार ठाकरे यांनी मताधिक्य कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. मात्र त्यांना यश मिळाले नाही.
भुसे यांचे मताधिक्य वाढत असतानाच इतर उमेदवारांच्या प्रतिनिधींनी हळूहळू मतमोजणी परिसरातून काढता पाय घेण्यास सुरुवात केली होती. दुसरीकडे शिवसैनिकांची व भुसे समर्थकांची गर्दी वाढू लागली होती. त्यांनी गुलाल उधळत घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. यात आमदार दादा भुसे आल्यानंतर त्यात प्रचंड भर पडली. यावेळी त्यांच्याबरोबर तालुकाध्यक्ष संजय दुसाने, शहराध्यक्ष रामा मिस्तरी, प्रमोद शुक्ला, बंडू बच्छाव, नंदकिशोर मोरे, जतीन कापडणीस, भरत देवरे, सुनील देवरे आदि उपस्थित होते.
या मतदारासंघात ८१ हजार ३२ महिलांनी, तर ९९ हजार ३२ पुरुष अशा एकूण एक लक्ष ८० हजार ६४ एवढे मतदान झाले असून, मतमोजणीसाठी १४ टेबल लावण्यात आले होते. मतमोजणीसाठी पर्यवेक्षक, सूक्ष्म निरीक्षक, सहायक, शिपाई प्रत्येकी १४ कर्मचारी, तर पोस्टल मते मोजण्यासाठी ४ कर्मचारी असे एकूण ६० कर्मचारी नेमण्यात आले होते. यावेळी मतमोजणी केंद्र परिसरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. मतमोजणीसाठी पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पुरुष व महिला कर्मचारी, राज्य राखीव दल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय पोलीस दल यांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. सर्वांची तपासणी करून मतमोजणी केंद्रात सोडण्यात येत होते. मतमोजणी केंद्रात दूरभाष नेण्यास बंदी करण्यात आली होती.