श्रमिकनगर भागात पावसामुळे कोटींच्या घरात नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 01:34 AM2019-10-01T01:34:20+5:302019-10-01T01:34:34+5:30
महानगरपालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेज लाइनची समस्या सुटू शकली नाही. त्याचा परिणाम म्हणजे श्रमिकनगर येथील माळी कॉलनीतील जवळपास ४५ ते ५० घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
सातपूर : महानगरपालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेज लाइनची समस्या सुटू शकली नाही. त्याचा परिणाम म्हणजे श्रमिकनगर येथील माळी कॉलनीतील जवळपास ४५ ते ५० घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी श्रमिकनगर येथील माळी कॉलनीतील अनेक घरांमध्ये शिरले. अचानक पाण्याचा प्रवाह घरात घुसल्याने घरातील रहिवाशांना बाहेर पडणे अवघड झाले होते. त्यात लहान बालके, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिलांना कसेबसे बाहेर काढण्यात आले. या घरांमध्ये जवळपास पाच ते सात फूट पाणी शिरले होते. कामगार वर्ग असलेल्या या वसाहतीतील रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. घरातील अन्नधान्य खाण्या-पिण्याचे साहित्य तर गेलेच शिवाय फ्रीज, दूरदर्शन संच, कपाट, पलंग, गाद्या, कपडे, शैक्षणिक कागदपत्रे, महत्त्वाची कागदपत्रे, घरांचे खरेदीखत, वह्या, पुस्तके आदींचे नुकसान झाले आहे. प्रत्येक घराचे जवळपास दोन ते अडीच लाख रु पयांचे नुकसान झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
गेल्या २५ ते ३० वर्षांपासून हे नागरिक या ठिकाणी वास्तव्याला आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी घुसल्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे.
पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी
श्रमिकनगर येथील माळी कॉलनीत सुमारे ३०० लोकसंख्या आहे. पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या ४५ ते ५० घरांचे रीतसर पंचनामे करून भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त रहिवाशांनी केली आहे. लवकरच या ठिकाणी तसा फलक लावून प्रशासनाचा निषेध करण्यात येणार असल्याचे संतप्त रहिवाशांनी सांगितले.
४माळी कॉलनीत एवढी मोठी घटना घडली असताना स्थानिक नगरसेवकांनी कोणतीही मदत केली नाही. साधी विचारपूसदेखील केली नाही. स्थानिक नगरसेवक आले आणि लांबून पाहून निघून गेले. मात्र श्री महारु द्र हनुमान पतसंस्थेच्या वतीने डाळ, तांदूळ, पीठ यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची मदत उपलब्ध करून दिल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी घरात शिरल्याने घरातील साहित्य, अन्न, धान्य, महागड्या वस्तूंचे नुकसान झाले आहे. वेळीच ड्रेनेज लाइन बदलली असती तर हे नुकसान झाले नसते. पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की त्यात कंपाउंडची भिंत पडली आणि पाणी घरात शिरले. दोन दिवस घरातील पाणी आणि गाळ काढायला लागले.
- वीरेंद्र सोनवणे
अनेक वेळा स्थानिक नगरसेवकांना भेटून ड्रेनेज लाइन बदलण्याची मागणी केली आहे. ड्रेनेज लाइन लहान आहे. महानगरपालिका प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे अशी जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली. प्रत्येक घराचे लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे. याला जबाबदार कोण ? महापालिकेने आम्हाला नुकसानभरपाई द्यावी.
- आसमा शेख
महानगरपालिका प्रशासनाने माळी कॉलनीतील ड्रेनेजची लाइन ताबडतोब बदलण्याचे काम हाती घ्यावे. जिल्हा प्रशासनाला वेळीच माहिती दिली आहे. तरीही अद्याप पंचनामे झालेले नाहीत. जिल्हा प्रशासनाने नुकसान झालेल्या प्रत्येक घराचे पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई मिळवून द्यावी.
- श्रीराम मंडळ