‘नृत्यानुष्ठान’ : एकल कथ्थक नृत्याविष्काराची नाशिककर रसिकांना भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 10:45 PM2018-02-11T22:45:10+5:302018-02-11T22:47:11+5:30
नटराज पंडित गोपीकृष्ण जयंतीच्या रजत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत कीर्ती कलामंदिराच्या वतीने दरमहा दुस-या रविवारी कथ्थक कलेच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘नृत्यानुष्ठान’ कार्यक्रम सुरू केला आहे.
नाशिक : कथ्थक कलेचे गुरू पंडित नंदकिशोर कपोते यांच्या शिष्या व प्रसिद्ध नृत्यांगणा नीलिमा हिरवे यांनी विविध पारंपरिक रचनांनी सजविलेला १३ मात्रांचा रास ताल, तर लखनौ घराण्याच्या खास गुरू-शिष्य परंपरेतून पंडित विजय शंकर यांच्या शागीर्द नृत्यांगणा शीला मेहता यांनी सादर केलेला रास ताल कलाविष्काराने नृत्यानुष्ठानाच्या माध्यमातून रसिकांना एकल कथ्थक नृत्याचा सौंदर्यानुभव दिला.
निमित्त होते, परशुराम सायखेडकर सभागृहात रविवारी (दि.११) रंगलेल्या ‘नृत्यानुष्ठान’चे. नटराज पंडित गोपीकृ ष्ण जयंतीच्या रजत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत कीर्ती कलामंदिराच्या वतीने दरमहा दुस-या रविवारी कथ्थक कलेच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘नृत्यानुष्ठान’ कार्यक्रम सुरू केला आहे. कथ्थक नृत्याविष्काराच्या सहाव्या पुष्पाला कलाप्रेमींनी रविवारी (दि.११) उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे म्हणून स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. विजयालक्ष्मी गणोरकर उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. हिरवे यांनी प्रारंभी गणेशवंदना सादर केली. त्यानंतर त्यांनी थाट, आमद, परण, त्रिमलू, तत्कार या पारंपरिक रचनांनी १३ मात्रांचा रास तालचे खास शैलीत सादरीकरण केले. सुरदासांच्या तीन दोह्यांनी कृष्णाच्या मुरलीविषयी असुया असणा-या गोपिकांच्या व्यथा त्यांनी आपल्या दुस-या नृत्यातून मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांना पराग हिरवे (तबला), स्वानंद कुलकर्णी (संवादिनी), श्रीपाद लिंबेकर (गायन), ऋतुजा जोशी (पढत) यांनी साथसंगत केली.