निफाड-दिंडोरीत सेनेचा उत्साह कायमनाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना येवला आणि नांदगाव विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच आघाडी आणि तीही घसघशीत आघाडी मिळाल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेससाठी ती धोक्याची घंटा ठरू शकते, तर निफाड आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा शिवसेनेने मोठी आघाडी देत आपला वरचष्मा कायम राखला.हरिश्चंद्र चव्हाण यांच्या विजयामुळे राष्ट्रवादीला तब्बल चार विधानसभा मतदारसंघांत आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. त्यामानाने राष्ट्रवादीचा मतदारसंघ असूनही बंडखोरी करून निवडून आलेल्या चांदवडमध्येही हरिश्चंद्र चव्हाण यांनी तब्बल ७० हजारांहून अधिक आघाडी घेतल्याने ती कॉँग्रेसचे, मात्र तांत्रिकदृष्ट्या अपक्ष असलेले आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्यासाठी हृदयाची धडधड वाढविणारी ही लोकसभेची निवडणूक ठरली आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर झालेल्या एकूण २ लाख ५० हजार ४८७ मतांपैकी १ लाख ७२ हजार मते भाजपाच्या हरिश्चंद्र चव्हाण यांना मिळाली, तर राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांना ३६ हजार ८०७ मतांवर समाधान मानावे लागले. कळवण-सुरगाणा मतदारसंघातून मात्र आमदार अर्जुन पवार यांनी आपला करिष्मा राखत डॉ. भारती पवार यांना एकूण १ लाख ६९ हजार ३२१ पैकी ६० हजार ५१४ मते मिळाली. याच एकमेव मतदारसंघातून हरिश्चंद्र चव्हाण पिछाडीवर असून, त्यांना ५२ हजार ६२८ मते मिळून ते डॉ. पवार यांच्यापेक्षा ७ हजार ८८६ मतांनी पिछाडीवर आहेत. चांदवड मतदारसंघातून १ लाख ५३ हजार ९४७ मतांपैकी हरिश्चंद्र चव्हाण यांना १ लाख ८ हजार ३८१, तर डॉ. भारती पवार यांना अवघी ३३ हजार ५३२ मते मिळाल्याने त्या ७४ हजार ८४९ मतांनी पिछाडीवर पडल्या. येवला या पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विधानसभा मतदारसंघातील झालेल्या एकूण १ लाख ६२ हजार ५८८ मतांपैकी हरिश्चंद्र चव्हाण यांना १ लाख २ हजार ९०२, तर डॉ. भारती पवार यांना अवघी ४९ हजार ८८९ मते मिळाल्याने त्या पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात ५३ हजार १३ मतांनी पिछाडीवर पडल्याचे चित्र होते. निफाड मतदारसंघात १ लाख ५१ हजार ६३६ मतांपैकी हरिश्चंद्र चव्हाण यांना १ लाख १ हजार ६१८, तर डॉ. भारती पवार यांना ४० हजार ५४६ मते मिळाली. येथून डॉ. भारती पवार या ६१ हजार ७२ मतांनी मागे पडल्या. (प्रतिनिधी)
येवला-नांदगाव राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा
By admin | Published: May 17, 2014 12:29 AM