लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभाग व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत प्राथमिक शिक्षक गटातून निफाड तालुक्यातील बाणगंगानगरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका नलिनी बन्सीलाल अहिरे यांच्या बोलक्या बाहुल्यांचा नवोपक्रम राज्यस्तरावर प्रथम आला आहे.प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक गटात राज्यातून ७२० प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी १४० प्रस्ताव पात्र झाले. राज्यस्तरीय पहिल्या १० उत्कृष्ट उपक्रमांचे सादरीकरण ऑनलाइन झूम मीटिंगद्वारे घेण्यात आले.
परीक्षक म्हणून डॉ. लीना देशपांडे, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. रवि जाधव, डॉ. श्रीशैलप्पा कामशेट्टी यांनी काम पाहिले. नलिनी आहिरे यांच्या ‘ऑनलाइन शिक्षणात बोलक्या बाहुल्यांद्वारे शिक्षक आपल्या दारी’ या नवोपक्रमाला प्रथम क्रमांक घोषित करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांनी आनंदाने शिकण्यासाठी नलिनी आहिरे ऐतिहासिक पात्र तयार करून मनोरंजनात्मक शिक्षण देण्याचा आणि विद्यार्थी सतत शिक्षण प्रवाहात टिकून राहण्यासाठी ‘बोलक्या बाहुल्यांद्वारे शिक्षक आपल्या दारी’ हा उपक्रम राबवित आहे. सामाजिक जनजागृती बोलक्या बाहुल्यांद्वारे केली जाते. महापुरुषांच्या पात्राचे पपेट तयार करून इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न नलिनी आहिरे यांनी केला आहे.
प्रादेशिक विद्या प्राधिकरणच्या अधिव्याख्याता डॉ. संगीता महाजन यांनी घेतलेल्या पपेट कार्य शाळेतूनच मला या उपक्रमाची प्रेरणा मिळाली. मनोरंजनात्मक शिक्षण देण्याचा आणि विद्यार्थी सतत शिक्षण प्रवाहात टिकून राहण्यासाठी हा उपक्रम राबविला.- नलिनी आहिरे, प्राथमिक शिक्षिका