दारणाकाठ : चांदगिरी गावाच्या शिवारात पुन्हा बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 03:30 PM2020-08-11T15:30:07+5:302020-08-11T15:36:42+5:30
नाशिक : दारणाकाठावरील चांदगिरी गावाच्या शिवारात असलेल्या एका फार्महाऊसच्या परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी (दि.११) पहाटेच्या सुमारास एक प्रौढ मादी ...
नाशिक : दारणाकाठावरील चांदगिरी गावाच्या शिवारात असलेल्या एका फार्महाऊसच्या परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी (दि.११) पहाटेच्या सुमारास एक प्रौढ मादी पिंज-यात जेरबंद झाली. या गावाच्या शिवारात हा दुसरा तर दारणाकाठालगतच्या शिवारात नाशिक पश्चिम विभागाला अकरावा बिबट्या पिंज-यात कैद करण्यास यश आले आहे. यामुळे दारणाकाठावरील भय आता कमी झाले आहे.
दारणाकाठालगत हिंगणवेढे, दोनवाडे, बाभळेश्वर गावात बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलांसह वृध्दाचा बळी गेला. तसेच पळसे, चेहडी, कोटमगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यांत मुले जखमी झाली. यामुळे दारणाकाठ बिबट्याच्या दहशतीखाली सापडला. येथील पंचक्रोशीत नागरिक भयभीत झाले होते. वनमंत्र्यांकडून याबाबत वनखात्याला सुचना करत मानवी जीवीतास धोकादायक ठरणा-या बिबट्या जेरबंद करण्याचे आदेश देण्यात आले आणि वनविभागाने युध्दपातळीवर मोहीम हाती घेत ३५ ट्रॅप कॅमेरे आणि २० पिंजरे लावण्यात आले. २ जुलैपासून अद्यापपर्यंत दारणाकाठालगतच्या गावांमधून सुमारे ११ बिबटे जेरबंद केले गेले आहे. ३०जुलै रोजी चांदगिरी शिवारात दीड वर्षाचा नर पिंजºयात अडकला होता. जेरबंद झालेल्या एकूण ११ बिबट्यांमध्ये ५ नर आणि ७ माद्यांचा समावेश आहे. सिन्नर परिक्षेत्रांतर्गत चिंचोली गावात एक नर व मादी कैद झाली होती. यापैकी सहा बिबट्यांचा मुक्काम बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानात आहे.
दारणाकाठालगत झालेल्या मानवी हल्ले नर बिबट्याकडून झाल्याचा निर्वाळा हैदराबादच्या सीसीएमबी प्रयोगशाळेकडून देण्यात आला आहे. यामुळे जेरबंद करण्यात आलेल्या मादी बिबट्यांची लवकरच मुक्तता होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत नाशिक पश्चिम वनविभागाकडून पत्रव्यवहार केला जात आहे; मात्र या विभागाच्या उपवनसंरक्षकांची औरंगाबाद येथे पदोन्नतीने बदली झाल्यामुळे कदाचित मादी बिबट्यांच्या सुटकेचा प्रस्ताव रखडण्याची चिन्हे आहेत. कारण अद्याप पश्चिम वनविभागासाठी नवीन उपवनसंरक्षकांची नेमणूक करण्यात आलेली नाही.