कळवण: संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत सप्तशृंगीमातेचे शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडाचा एकीकडे मोठ्या प्रमाणावर विकास होत असताना, हाकेच्या अंतरावरील महर्षी मार्कण्डेय यांची तपोभूमी असलेल्या मार्कण्डेय पर्वतावर काहीअंशी वनविभागाच्या माध्यमातून झालेली कामेवगळता पर्वताच्या वाटा पुरातत्व विभाग व पर्यटन विभागाच्या दुर्लक्षामुळे अंधारातच होत्या. त्या अंधारवाटा निसर्ग सौंदर्य ग्रुप, लाडशाखीय वाणी सखी परिवार व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने कुठल्याही शासकीय मदतीची वाट न बघता लावलेल्या सौरदीपांनी प्रकाशमान झाल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त होत आहे. सप्तशृंगीमातेचे दर्शन झाल्यानंतर अष्टऋषीतील महर्षी मार्कण्डेय यांची तपोभूमी असलेला मार्कण्डेय पर्वताला भाविक आवर्जून भेट देत असतात. सोमवती अमावास्येला पर्वतावर भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मात्र सोयीसुविधांची कमतरता असल्यामुळे अनेक भाविकांना दर्शनापासून वंचित राहावे लागते. याच गोष्टींचा विचार करून बोरिवली येथील विजय अमृतकर यांनी पर्वतावर सौर दिवा लावण्याचा संकल्प बोलून दाखवला. त्यांना निसर्ग सौंदर्य ग्रुप, लाडशाखीय वाणी सखी परिवार व मार्कण्डपिंप्री गावातील ग्रामस्थ या सर्वांनी पाठिंबा दिला. त्यानंतर सुरू झाला अंधार वाटा प्रकाशमान करण्याचा दृढ संकल्प पूर्तीचा प्रवास. सर्वांच्या अथक परिश्रमातून आषाढी एकादशीच्या सुमुहूर्तावर सौर दीप प्रज्वलित होऊन मार्कण्डेय पर्वताच्या वाटा प्रकाशमान झाल्या. या सर्व कामात लाडशाखीय वाणी सखी सदस्यांसह निसर्ग सौंदर्य ग्रुपसह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले.------------------ग्रामस्थांनी वाहिले साहित्यसंकल्प पूर्तीसाठी सामानाची जमवाजमव झाली; मात्र पर्वताच्या अंगावर येणाºया दुर्गम पायवाटांनी सोलर दीपांचे पाइप, बॅटरी पॅनल असे अवजड साहित्य कसे न्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला. सदर माहिती मार्कण्ड पिंप्री येथील रमेश जोपळे, निवृत्ती जोपळे, चिंतामण बंगाळ,पंडित गायकवाड, मधुकर गवळी, कांतिलाल गवळी यांच्यासह ग्रामस्थांना मिळाली तेव्हा त्यांनी सर्व साहित्य डोंगरावर पोहोचवण्याची जबाबदारी घेतली. त्यांच्या शारीरिक परिश्रमाने हा प्रकल्प सहज व विनाखर्च पूर्ण झाला.-----------------सप्तशृंगगड व मार्कण्डेय पर्वत यांच्यावर मोठ्या प्रमाणात जगात कुठेही न आढळणाºया दुर्मीळ औषधी वनस्पती आहेत. भारतभरातून लाखो भाविक येथे येत असतात. या परिसराला पौराणिक धर्मग्रंथांमध्ये विशेष स्थान आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाने पर्वताचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न करावेत.- योगेश गवळी, सदस्य,निसर्ग सौजन्य ग्रुप
मार्कण्डेय पर्वतावर उजळल्या अंधारवाटा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 8:43 PM