वडिलांच्या खुनातून मुलगी मुक्त, आईची जन्मठेप कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 01:02 AM2021-02-06T01:02:34+5:302021-02-06T01:03:20+5:30
नाशिक : सातपूर येथील दिलीप देवरे यांचा खून केल्याच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली पत्नी कमलाबाई देवरे आणि विवाहित मुलगी मंगला शिंदे यांच्या अपिलावर उच्च न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने मुलीची खटल्यातून मुक्तता केली; मात्र पत्नीची शिक्षा कायम ठेवली आहे.

सदरची घटना सातपूर येथे डिसेंबर २००६ मध्ये घडली होती. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती. या खटल्याची सुनावणी नाशिकच्या सत्र न्यायालयात होऊन न्यायालयाने पत्नी कमलाबाई देवरे आणि मुलगी मंगला शिंदे यांना २०१३ मध्ये जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. सदर शिक्षेच्या विरोधात आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले असता, ॲड. अनिकेत निकम यांनी आरोपींची बाजू उच्च न्यायालयात मांडली. त्यात त्यांनी हा खटला परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित आहे आणि पुराव्यांची साखळी सकृत्दर्शनी आरोपींचा गुन्हा सिद्ध करत नाही. ज्या दिवशी घटना घडली त्या रात्री मुलगी मंगला शिंदे ही घरात होती अशा स्वरूपाचा सबळ पुरावादेखील न्यायालयापुढे आला नाही. पुरावा नसताना मुलीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावणे बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करावी, असा युक्तिवाद केला. उच्च न्यायालयाचे द्विसदस्यीय खंडपीठाचे न्यायमूर्ती साधना जाधव व नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून मुलगी मंगला शिंदे हिला निर्दोष मुक्त केले.