सटाणा : स्वत:च्या लग्नपत्रिका वाटत असताना नाशिक येथे दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात वराचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी (दि. १८) रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने सटाणा शहरात शोककळा पसरली आहे.सटाणा तहसीलमध्ये तलाठी असलेले बी.डी. धिवरे यांचे चिरंजीव नीलेश बाळासाहेब धिवरे यांचा विवाह सटाणा तहसीलमधीलच अव्वल कारकून रवींद्र मगर यांच्या कन्येशी २५ डिसेंबर रोजी मराठा हायस्कूल सटाणा येथे होणार होता. विवाहसोहळ्याची संपूर्ण जय्यत तयारी झालेली असताना नाशिक येथील जवळच्या मित्रपरिवाराला व नातेवाइकांना विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी नीलेश सोमवारी नाशिक येथे गेला होता. रात्री उशिरा पत्रिका वाटून तो मामांकडे मुक्कामी जात असताना सिडको परिसरातील अतुल डेअरी परिसरात त्याची दुचाकी दुभाजकाला धडकल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. उपचार मिळण्यापूर्वीच नीलेशचा मृत्यू झाला. सटाणा शहरातील शिवाजीनगर येथे राहणाºया धिवरे कुटुंबीयांवर या दु:खाचा डोंगर कोसळला असून, विवाहाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असतानाच अशी दुर्दैवी घटना घडल्याने शिवाजीनगरसह भाक्षी रोड शोकसागरात बुडाला आहे. लग्नपत्रिकेमुळे पटली ओळख रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याने घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना नीलेशची ओळख पटत नव्हती; मात्र त्याच्याजवळ असलेल्या पिशवीत लग्नपत्रिका पोलिसांना आढळून आल्या. लग्नपत्रिकेवर असलेल्या मोबाइल क्रमांकावर पोलिसांनी संपर्क साधून अपघाताची माहिती धिवरे कुटुंबीयांना देण्यात आली.
लग्नपत्रिका वाटणाºया वराचा दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 1:10 AM