नगरसूल परिसरात उष्माघाताने मोराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 06:36 PM2019-04-13T18:36:49+5:302019-04-13T18:38:29+5:30
नगरसूल : परिसरातील फरताळेवाडी शिवारात उष्माघाताने मोराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. वनविभागाने या प्रकाराची दखल घेऊन हरणांसाठी असलेल्या पाणवठ्यांच्या धर्तीवर नगरसूल परिसरात मोरांसाठीही ठिकठिकाणी सिमेंटच्या कुंड्या ठेवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
जनार्दन फरताळे याच्या शेतातून मोर भर दुपारी घराकडे येत असतांना अचानक खाली कोसळला. त्यास तत्काळ उचलून घराकडे सावलीत आणले, पाणी पाजण्याचाही प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत सदर मोराने प्राण सोडल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती नगरसूलचे सरपंच प्रसाद पाटील यांना मिळताच त्यांनी वनविभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. काही वेळातच वनविभागाचे कर्मचारी विलास बागुल आल्याने मृत मोर त्यांच्या स्वाधीन करण्यात आला. ज्याप्रमाणे राजापूर, ममदापूर परिसरात हरणांची संख्या जास्त आहे त्याचप्रमाणे नगरसूल परिसरात मोरांची संख्याही अधिक आहे. या गावात फरताळवाडी, वाईबोथी, रावते वस्ती, माळवाडी, कोळगाव, कटके कापसे वस्ती, भक्ताचा मळा (नांदगाव रोड), सानप वस्ती, धनगर वस्ती, कुडके वस्ती, बाराचा मळा, धना माळी मळा, मागफाशी, वडाचामळा, चिखले वाडी, आमदार वस्ती बोढारे वस्ती, तेली बहादुरे वस्तीवर मोरांची संख्या जास्त आहे. ते मिळेल त्या ठिकाणाहून पाणी पिऊन तहान भागवतात. शेतात, विहीरीवर पाणी साठविण्यासाठी साधन नसल्याने पाणी भरु न ठेवता येत नाही. हरणांसाठी जसे पाणवठे तयार केलेले आहेत, तसे नगरसुल परिसरातील मोरांसाठीही सिमेंटच्या कुंड्यांची व्यवस्था वनविभागाने करावी, अशी मागणी केली जात आहे.