आझादनगर : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या येथील रोहित्रावर काम करीत असताना विजेचा धक्का लागून गंभीर जखमी झालेल्या फैज मोहंमद (२७) या खासगी वायरमनचा मुंबई येथे उपचारादरम्यान बुधवारी सकाळी मृत्यू झाला. रात्री उशिरा बडा कब्रस्थान येथे त्याचा दफनविधी करण्यात आला.फैज मोहंमद मो. इस्माईल (२७), रा. गुलशेरनगर हा खासगी वायरमन शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास म्हाळदे शिवार, सवंदगाव रस्त्यावर रोहित्रावर काम करीत होता. त्यावेळी अचानक विजेचा धक्क लागून तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येऊन अधिक उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले होते; परंतु त्याची तब्बेत अधिक गंभीर होत चालल्यामुळे त्यास मुंबई येथील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे आज सकाळी आठ वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी येताच गुलशेरनगर भागात नागरिकांनी हळहळ व वीज वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विजेचे खांब व रोहित्रावरील कामे स्वत: न करता या खासगी कर्मचाऱ्यांमार्फत करून घेतली जातात. यामुळे अशा कंपनीशी काहीएक संबंध नसणाऱ्या व्यक्तींना आपला जीव गमवावा लागतो. अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई व मृताच्या परिवारास २० लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तीस वीज कंपनीत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी शहरातील खासगी वायरमन यांच्या मालेगाव समस्या निवारण समितीकडून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत पवारवाडी पोलिसांत वीज वितरण कंपनीचे कक्ष अधिकारी अमित जयप्रकाश श्रीवास्तव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गढरी करीत आहेत. मृत मोहंमद फैजच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. (वार्ताहर)
विजेच्या धक्क्याने जखमी खासगी वायरमनचा मृत्यू
By admin | Published: February 11, 2015 11:47 PM