पिळकोस : एक वर्षापासून येथे वायरमन नसल्याचे वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिद्ध होताच, महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पिळकोस गावाला वायरमन देण्याचा निर्णय घेत वायरमनची नेमणूक केल्याने पिळकोस ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. कळवण तालुक्यातील पिळकोस येथे एक वर्षापासून वायरमन नसल्यामुळे शेतकऱ्यांची व ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत होती व विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते. वायरमन नसल्यामुळे त्याची कामे गावातील शेतकऱ्यांना करावी लागत होती. वायरमन नसल्यामुळे शेतकऱ्यांना विजेच्या खांबावर स्वत: चढून तुटलेल्या तारा जोडाव्या लागत असल्यामुळे मागील वर्षी ललित मोहन वाघ, किरण शांताराम जाधव हे शेतकरी रोहित्राचा डीओ टाकत असताना त्यांना विजेच्या उच्च दाबाचा मोठा धक्का लागल्याने ते रोहित्रावरून खाली पडून जखमी झाले होते.पिळकोस गावाला कायमस्वरूपी निवासी वायरमन मिळावा ही शेतकऱ्यांची मागणी एक वर्षापासून जोर धरत होती. परंतु शेतकऱ्यांच्या या मागणीला महावितरण कंपनीचे अधिकारी कुठलीच दाद देत नव्हते. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग आली व त्यांनी पिळकोस गावासाठी वायरमनची नेमणूक केली. यामुळे परिसरातील सर्व शेतकऱ्यांचा व गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडला असून, आता रोहित्रावरील दुरुस्तीची कामे शेतकऱ्यांना करावी लागणार नसल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पिळकोस गाव व शिवारात कृषिपंपासाठी एकून साठ रोहित्रे असून, परिसरातील विद्युतवाहक तारा या जुनाट झाल्याने त्या हवा आल्याने, पाऊस पडल्याने तुटत असतात. पिळकोस गाव हे ठेंगोडा सब डिव्हिजनवरील शेवटच्या टोकाचे गाव असल्यामुळे दहा वर्षांपासून येथे अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे पिळकोस शिवारातील रोहित्रात बिघाड होणे, फ्युज जाणे, डीओ जाणे, रोहित्राची केबल जळणे, वीजतारा झाडांना लागून फ्वालट होणे, रोहित्रामधून शेतकऱ्यांच्या कृषिपंपापर्यंत तिन्ही फेजचा सुरळीत पुरवठा न होणे, रोहित्रावर लोड आल्यावर रोहित्राची बुशिंग जळणे व कायम रोहित्र जळणे, त्यामुळे शेतकऱ्यांचे कृषिपंप जळणे असे प्रकार रोज शिवारात घडत असतात. वायरमन नसल्यामुळे ही सर्व कामे शेतकरी करत होती. यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही होत होते व शेतीपिकांचेही नुकसान होत होते व शेतकऱ्याला विजेचा धक्काही खावा लागत होता. तब्बल एक वर्षानंतर पिळकोसला पुन्हा वायरमनची नेमणूक झाल्यामुळे आता परिसरातील वीजपुरवठा सुरळीत टिकून राहील व यापुढे कुठल्याही शेतकऱ्याला विजेचा धक्का बसणार नाही, अशी आशा आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.पिळकोस गावाला एक वर्षानंतर पुन्हा वायरमनची नेमणूक झाल्यामुळे उपसरपंच साहेबराव रेवबा जाधव, शेतकरी संघटनेचे नेते शांताराम जाधव, भाजपा उपाध्यक्ष राहुल सूर्यवंशी, रवींद्र वाघ, साहेबराव जाधव, निवृत्ती जाधव, हंसराज वाघ, दादाजी जाधव, केवळ वाघ, मुरलीधर वाघ, उत्तम मोरे, रामदास अहेर, मंगेश अहेर, राहुल अहेर यांसह परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. (वार्ताहर )
पिळकोस गावाला वायरमन देण्याचा निर्णय
By admin | Published: August 29, 2016 11:49 PM