जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची ऑनलाईन सभा अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आयत्या विषयांवर चर्चा करताना जवळपास सर्वच सदस्यांनी ग्रामीण भागात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली. आत्माराम कुंभार्डे यांनी ग्रामीण व शहरी भागात कोठेही रुग्णांसाठी खाटा उपलब्ध होत नसल्याचे सांगून भविष्यात हीच परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात असल्याचे सांगितले. रुग्णांना दाखल करण्यास जागा तर नाहीच परंतु त्यावर उपचार म्हणून रेमडेसिवीर इंजेक्शन तसेच ऑक्सिजनही मिळत नसल्याने रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढल्याचे सांगण्यात आले. तर अध्यक्ष क्षिरसागर यांनी ग्रामीण भागातील खासगी रुग्णालयांची तयारी असेल तर त्यांना कोविड रुग्णांवर उपचाराची परवानगी देण्यास हरकत नसल्याचे सांगितले किंवा खासगी रुग्णालयातील ५० ते ६० टक्के खाटा राखीव ठेवता येतील काय याचीही चाचपणी करण्याची सूचना केली.
जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले असले तरी, ते अपुरे पडू लागल्याने सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड सेंटर सुरू करून रुग्णांवर उपचाराची सोय करण्यात यावी. त्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर व इतर साहित्य खरेदीस जिल्हा परिषदेने मान्यता द्यावी अशी सूचना कुंभार्डे यांनी केली. त्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर यांनी सर्वच आरोग्य केंद्रांमध्ये तशी व्यवस्था केल्यास नॉनकोविड रुग्णांची गैरसोय होणार असल्याचे सांगितले. त्यापेक्षा ज्या तालुक्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या अधिक आहे त्या तालुक्यात अधिकाधिक प्राथमिक आरोग्य केंद्रात अशा प्रकारची सोय करता येऊ शकेल. त्यासाठी आजच अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
चौकट
सावरगावच्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई
येवला तालुक्यातील सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू असतानाही दोघे वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याची तर एक वैद्यकीय अधिकारी अनधिकृत गैरहजर असल्याची तक्रार सविता पवार यांनी केली असता, अनधिकृत गैरहजर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला नोटीस बजावून त्यांची सेवा समाप्त करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी आहेर यांनी सांगितले.