बांबू मंडळाच्या सामायिक सुविधा केंद्राचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 08:37 PM2021-01-11T20:37:24+5:302021-01-12T01:18:56+5:30
कळवण : महाराष्ट्र राज्य बांबू विकास मंडळाच्या आर्थिक साहाय्याने उंबरठाण वनपरिक्षेत्रातील देवगाव येथे उभारलेल्या सामायिक सुविधा केंद्राचे लोकार्पण करण्यात आले असून बांबूपासून बनविलेल्या विविध शोभिवंत व कलाकुसरीच्या वस्तू बनविण्याकरिता आवश्यक असलेल्या साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
वनसंपत्तीने विपुल असलेल्या सुरगाणा तालुक्यातील देवगाव येथील स्थानिकांना अवगत असलेल्या पारंपरिक हस्तकलेला आधुनिकतेची जोड प्राप्त व्हावी, त्यामुळे उपजत असलेल्या कलेचे जतन होऊन स्थानिकांचा सर्वांगीण विकास होईल, या उद्देशाने नाशिक पूर्व विभागाने महाराष्ट्र राज्य बांबू विकास मंडळाच्या आर्थिक साहाय्याने उंबरठाण वनपरिक्षेत्रातील मौजे देवगाव येथे सामायिक सुविधा केंद्र कार्यान्वित केले आहे. या केंद्राचे लोकार्पण राज्य बांबू विकास मंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक टी. एस. के. रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय समन्वयक बी. पी. पवार, सुरगाणा उपविभागाचे सहायक वनसंरक्षक हेमंत शेवाळे, गोंदूने ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच वाडेकर, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पवार आदी उपस्थित होते.
या केंद्रात बांबूपासून विविध शोभिवंत व कलाकुसरीच्या वस्तू बनविण्याकरिता आवश्यक असलेल्या साधनसामग्री फोर साईड प्लेनर कट ऑफ मशीन, डिस्क सॅनडर, नॉट रिमोव्हर, पॉलिश मशीन इत्यादी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. स्थानिक कारागिरांना या साधनसामग्रीच्या साहाय्याने वस्तू बनविण्याकरिता दि.१८ जानेवारीपासून तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या टीममार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
दर्जेदार वस्तुनिर्मितीचे आवाहन
बांबू विकास मंडळाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या साधनसामग्रीचा स्थानिकांनी पुरेपूर व योग्य वापर करून चांगल्या दर्जाच्या शोभिवंत व कलाकुसरीच्या वस्तू तयार करून चांगले आर्थिक उत्पन्न प्राप्त करून गावाच्या सर्वांगीण विकासात मोलाचा वाटा उचलावा अशी अपेक्षा यावेळी महाराष्ट्र राज्य बांबू विकास मंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक टी. एस. के. रेड्डी यांनी व्यक्त केली.