मोहाडीत परिचारिका प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 11:08 PM2022-05-16T23:08:00+5:302022-05-16T23:10:20+5:30
दिंडोरी : परिचारिका या डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील दुवा आहेत. डॉक्टर रुग्णांचे निदान करीत असले तरी रुग्णांवर उपचार व सुश्रुषा करण्यात परिचारिकांचे महत्त्व जास्त आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी काढले.
दिंडोरी : परिचारिका या डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील दुवा आहेत. डॉक्टर रुग्णांचे निदान करीत असले तरी रुग्णांवर उपचार व सुश्रुषा करण्यात परिचारिकांचे महत्त्व जास्त आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी काढले.
नाशिक जिल्हा रुग्णालय अंतर्गत नव्याने स्थापित झालेल्या मोहाडी येथील परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत झाला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद गटनेते प्रवीण जाधव, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. के. आर. श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार, भाजपचे बापूसाहेब पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयुष्यमान भारत योजना अंतर्गत स्थानिक १० लाभार्थ्यांना गोल्डन हेल्थ कार्ड देण्यात आले.
यावेळी डॉ. भारती पवार पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यातील परिचारिकांना चांगल्या वातावरणात उभ्या केलेल्या प्रशिक्षण केंद्राचा लाभ मिळेल. शिक्षण आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिकल अनुभव ग्रामीण पातळीवर सहजतेने उपलब्ध होईल. ग्रामीण भागात अशा प्रकारच्या प्रशिक्षण केंद्रांमुळे आरोग्यसेवा बळकट होण्यास मदत होते, असेही पवार यांनी सांगितले. नीलेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर सागर अस्माळ यांनी आभार मानले. यावेळी मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. छगन लोणे, डॉ. कल्पेश चोपडे, डॉ. राहुल कुशारे, मंडल अधिकारी भगवान काकड, तलाठी किरण भोये, गोरख गायकर, आदी उपस्थित होते.
मी व विद्यमान केंद्रीयमंत्री जिल्हा परिषदेचे सदस्य असताना या प्रशिक्षण केंद्राला मान्यता मिळाली आहे. जागा, निधी यासाठी आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता केली. त्यासाठी ग्रामपंचायत व गावातील लोकप्रतिनिधींनी विशेष श्रम घेतले. परंतु, उद्घाटनाच्या वेळी गावाला विश्वासात घेतले नाही. ज्या पद्धतीने प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण सोहळा तातडीने पार पडला त्याच पद्धतीने पुढील कामेही पार पाडावीत.
- प्रवीण जाधव, माजी गटनेते, जिल्हा परिषद