नाशिक : महापालिकेकडे रीतसर अर्ज व इतर कागदांची पूतर्ता करूनही महापालिकेच्या अनेक विभागीय कार्यालयांतून आठ ते पंधरा दिवसांनंतरही जन्मतारखेचे दाखले मिळत नसल्याची तक्रार होत आहे. अनेक विभागीय कार्यालयांत संगणकावर दाखले तयार आहेत, तर साहेबांची सही व शिक्का नसल्याने दाखला मिळत नाही. निवडणूक असल्याने साहेब बाहेर गेले आहेत, मिटिंग सुरू आहे अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. जास्त बोलल्यास पेंडिंगमध्ये टाकू असे सांगण्यात येते. त्यामुळे जास्त न बोलता माघारी फिरावे लागते. दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास लाइन व्यस्त आहे, असे सांगण्यात येते. कर्मचाऱ्यांनी सांगितल्या दिवशी चकरा माराव्या लागत आहे. तरी संबंधितांनी त्वरित याकडे लक्ष देऊन विभागीय कार्यालयांना सूचना देऊन लवकरात लवकर दाखले द्यावेत, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)