सातपूर : नाशिकहून मोठ्या प्रमाणात शेतीमाल ट्रक कंटेनरने जे.एन.पी.टी.पर्यंत घेऊन जावा लागत असल्याने जलद व सुलभ वाहतुकीच्या दृष्टीने नाशिक ते जे.एन.पी.टी.असा स्वतंत्र रेल्वेमार्ग तयार करण्यात यावा,तसेच निर्यातवृध्दीसाठी राज्य सरकारने प्रोत्साहन योजना जाहिर करावी अशी मागणी महाराष्ट्र चेंबर्सच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन केली आहे.महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली.महाराष्ट्र चेंबर्स अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी अडचणी मांडतांना सांगितले की,देशभरात कोरोना काळात लॉक डाऊन जाहीर करण्यात आला व त्याकाळात सर्वच व्यापार उद्योग बंद होते.त्यामुळे अर्थचक्रही बंद झाले होते.त्याचा परिणाम व्यापार उद्योगांवर झाला आहे.या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी महाराष्ट्र चेंबरने सरकारच्या हाताहात घालून अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न केले. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री,कृषीमंत्री, ऊर्जामंत्री,आमदार,खासदार यांच्याशी पत्र व्यवहार केला.तसेच राज्यस्तरीय वेबिनारच्या माध्यमातून व्यापार उद्योग,शेतकऱ्यांशी निगडित अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. व्यापार उद्योग व त्यामुळे निर्माण झालेली स्थिती याची माहिती दिली. तसेच महाराष्ट्रातील उद्योग,कृषीसंलग्न उद्योग,वाहतूक,वीज बिलात सवलत,विदर्भात पर्यटन प्रोत्साहन योजना तसेच कोविडमुळे उदभवलेले प्रश्न यासह विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. यावेळी चेंबरचे विश्वस्त आशिष पेडणेकर,माजी उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी,सुभाष मयेकर,गणपत बेळणेकर, चंद्रकांत मोकल,किशोर परुळेकर,सागर नागरे यांनीही चर्चेत भाग घेतला.व मागण्यांचे निवेदन दिले.