येवला : यंदा कोरोनाने बाजारपेठांसह सणवार, मंदिर आदी सर्वच लॉकडाऊन झाले. परिणामी तीन वर्षानंतर येत असलेला अधिकमास अर्थात धोंड्याचा महिनाही कोरोनाच्या सावटाखालीच साजरा होत आहे. तर खास जावईबापूंसाठी खापराच्या मांड्यांना मात्र मागणी वाढली असल्याचे दिसून येत आहे.अधिकमास निमित्ताने सासुरवाडीहून जावईबापूंना खास निमंत्रण दिल्या जाते. सासरी आलेल्या जावईबापूंना खास गोडाधोडाचे भोजन व भेट दिल्या जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या समारंभाला मर्यादा आल्या असल्या तरी ग्रामीण भागात गावोगावी खापरावरील मांडे बनविण्याची लगबग दिसून आली.ग्रामीण भागात काही महिलांनी खापरावर मांडे तयार करून विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. साधारणत: मांड्याची साईज दीड बाय दीडची असते. एका मांड्याची किंमत 70 रूपये आहे. ज्यांना घरी मांडे करणे शक्य नाही ते या महिलांकडून मांडे खरेदी करतात. गव्हाचे पिठ, गुळ, हरभरा दाळ आदी सामग्री पासुन बनविण्यात येणारा मांडा मातीच्या खापरावर भाजल्या जातो. खाण्याला स्वादिष्ट व चविष्ट लागणार्या या खापरावरील मांड्यांना ग्रामीण भागासह शहरवासीयांचीही पसंती मिळत आहे.