चांदोरी : सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, एप्रिल महिन्यात राज्यातील विविध विभागातील वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी प्रशिक्षणार्थींनी केली आहे.
शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा व दहावी, बारावी तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग या परीक्षा होत्या. मागील आठवड्यात महाराष्ट्र आयोगाने ११ एप्रिल रोजीची परीक्षा पुढे ढकलली व सोमवारी बारावी व दहावीच्या विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी आता १९ एप्रिलपासून सुरू होणारी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करीत आहे.
यावेळी विद्यार्थी परिषदेचे प्रमुख प्रवीण राडे यांनी यासंदर्भात राज्यपाल व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना पत्र लिहून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. अनेक विद्यार्थी होस्टेलवर राहतात. एका खोलीत चार विद्यार्थी निवास करीत आहेत. कडक निर्बंध असल्याने मेस बंद तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांना कोरोनाने ग्रासले आहे.
त्या मुलांचे शैक्षणिक नुकसान व्हायला नको व परीक्षेपेक्षा आरोग्य महत्त्वाचे असून सद्यस्थिती गंभीर असल्याने परीक्षा पुढे ढकलाव्यात व प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास परीक्षाचे आयोजन करावे, अशी मागणी विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण राडे यांनी केली आहे.राज्यात कोरोना विषाणूची परिस्थिती गंभीर असल्याने इतर परीक्षा रद्द केल्या आहेत. आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मानसिक त्रासात आहोत. सध्या परिस्थिती गंभीर असल्याने परीक्षा काही काळ पुढे घ्याव्यात.- सौरभ कदम, परीक्षार्थी.राज्यातील अनेक विद्यार्थी कोरोना बाधित झाले आहेत, तसेच अनेक भागात टाळेबंदी असल्याने होस्टेलवर राहणाऱ्या मुलांना जेवणाची अडचण आहे तसेच राज्यातील कोरोना परिस्थिती गंभीर आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाची काळजी करावी व काही काळ परीक्षा पुढे ढकलाव्या.- प्रवीण राडे, प्रदेशाध्यक्ष, वैद्यकीय विद्यार्थी परिषद.