रणतळ्यातून मुरमाची वाहतूक बंद करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:30 AM2019-06-05T00:30:33+5:302019-06-05T00:30:44+5:30
दिंडोरी : शहरालगत असलेल्या रणतळ्यातून मातीच्या नावाखाली मुरमाची अवैधरीत्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असून, ती त्वरित थांबवावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांना दिंडोरी कृती समितीचे रणजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

रणतळे या ठिकाणी नगरपंचायत तथा तहसील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या बगिचाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. बगिचाला खेटून अवैधरीत्या जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू असून, मातीच्या नावाखाली मुरूम वाहण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यात तळ्यात पाणी साचल्यास कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. हे एक ऐतिहासिक ठिकाण असून, या तळ्याचे पाणी दिंडोरी तथा परिसरातील आजूबाजूच्या खेड्यांना खूप उपयोगी पडते; परंतु प्रत्यक्षात मुरूम काढल्यामुळे तळ्यातील पाणी लवकर आटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने हे खोदकाम त्वरित थांबवावे व नगरपंचायतने बगिचाची देखरेख करावी, अशी मागणी दिंडोरी शहर कृती समितीच्या वतीने रणजित देशमुख, संतोष मुरकुटे, सतीश पाटील, संतोष आंबेकर, युवराज शिंदे आदींनी केली आहे.