वडांगळीत लसीकरण केंद्राची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:14 AM2021-03-31T04:14:26+5:302021-03-31T04:14:26+5:30
कोरोनाचा दुसऱ्या टप्प्यातील प्रसार हा वेगाने होत असून, वडांगळी येथे रुग्णांची संख्या जास्त आहे. सध्या देवपूर येथे ज्येष्ठ नागरिक, ...
कोरोनाचा दुसऱ्या टप्प्यातील प्रसार हा वेगाने होत असून, वडांगळी येथे रुग्णांची संख्या जास्त आहे. सध्या देवपूर येथे ज्येष्ठ नागरिक, प्रशासकीय कर्मचारी आदींना लसीकरण सुरू आहे. मात्र, कोरोना लसीकरण केंद्र जर वडांगळी येथे सुरू केले तर गावातील ज्येष्ठ नागरिकांना सोयीचे होईल. शिवाय वडांगळी गाव सतीमाता, सामतदादा देवस्थानच्या भाविकांमुळे वर्दळीचे बनले आहे. गावातील व्यापार, व्यवसाय करणाऱ्या वर्गालादेखील कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर आहे. यासाठी सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचारी, व्यापारीवर्ग, शेतमाल अथवा इतर वस्तू ने-आण करणारे वाहनचालक व मालक कंपनीमध्ये जाणारे कामगार यांना वरील क्रमाने लस देणे आवश्यक असल्याचे सरपंच घोटेकर यांचे म्हणणे आहे. डॉ. दावल साळवे यांचीदेखील मदत झाली. सुदेश खुळे यांनी देखील आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे याबाबत मागणी केली होती. जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे यांनीही डॉ. आहेर यांच्यासोबत चर्चा करीत उपकेंद्रस्तरावर लसीकरण सुरू करणे कसे आवश्यक आहे हे पटवून देत त्यावर लवकर अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या. त्यावर डॉ. आहेर यांनी लस पुरवठा अद्याप कमी असल्याने लसीकरण केंद्रात वाढ करणे शक्य होत नसल्याचे स्पष्ट केले. तरीदेखील दोन उपकेंद्रांवर लसीकरण केंद्र सुरू करण्यास त्यांनी सकारात्मकता दर्शवित तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांच्याकडून वडांगळी व पंचाळे या दोन गावांचे प्रस्ताव मागवून घेतले आहेत.