वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्कर म्हणून घोषित न केल्याने महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यासाठी १७ मे रोजी महानिर्मिती, महापारेषण, महावितरण वीज कंपनीतील एमएसईबी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या वीज कर्मचाऱ्यांनी निषेध करून आंदोलन केले. त्यात महानिर्मितीच्या एकलहरे वीज केंद्रातील वर्कर्स फेडरेशन संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्य व सभासदांनीदेखील घोषणा देत आंदोलन केले. गेल्या मार्चपासून वीज कर्मचारी जीव धोक्यात घालून अखंडितपणे वीजपुरवठा करीत आहेत. कोरोना काळातही सेवा बजावत असताना उपचाराअभावी ४००च्या वर कुशल कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला असून, अजूनही काही जण रुग्णालयात कोरोनाशी झुंज देत आहेत. कोरोनाचा हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा असून त्यांना अखंडितपणे मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती, वहन, वितरण करता यावे त्यासाठी शासनाने त्यांना फ्रंटलाइन वर्कर म्हणून घोषित करावे, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनाप्रसंगी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे पदाधिकारी सुरेश चौधरी, नारायण देवकाते, महेश ठाकरके, छगन थोटे, नरेंद्र खैरनार, सुभाष काकडे, भागवत धकाते, रवींद्र विभांडीक, दौलत गावित, विजय साळवे, आकाश आडके, सलीम शेख आदी उपस्थित होते. (फोटो १९ वीज)
वीज कर्मचाऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:15 AM