शहरात डेंग्यूचा वाढला प्रकोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 01:58 AM2019-09-24T01:58:10+5:302019-09-24T01:58:44+5:30
दर पावसाळ्यात नाशिककरांना होणारा डेंग्यूचा त्रास यंदा कमी होत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगितले जात असताना हळूहळू डेंग्यूचा उपद्रव वाढत असून, सप्टेंबर महिन्यांच्या तीन आठवड्यांत ही संख्या १०५वर गेली आहे. गेल्या संपूर्ण महिनाभरात ११७ रुग्ण आढळले होते. मात्र या महिन्यात यापेक्षा अधिक रुग्ण वाढण्याची चिन्हे आहेत.
नाशिक : दर पावसाळ्यात नाशिककरांना होणारा डेंग्यूचा त्रास यंदा कमी होत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगितले जात असताना हळूहळू डेंग्यूचा उपद्रव वाढत असून, सप्टेंबर महिन्यांच्या तीन आठवड्यांत ही संख्या १०५वर गेली आहे. गेल्या संपूर्ण महिनाभरात ११७ रुग्ण आढळले होते. मात्र या महिन्यात यापेक्षा अधिक रुग्ण वाढण्याची चिन्हे आहेत. जानेवारी महिन्यापासून आत्तापर्यंत २८२ रुग्ण आढळले आहेत. सुदैवाने डेंग्यूमुळे कोणाचा बळी गेल्याची अधिकृत नोंद महापालिकेत झालेली नाही. तथापि, वाढत्या रुग्ण संख्येमुळे त्यामुळे शहरवासीयांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.
नाशिक शहरात गेल्या काही वर्षांत डेंग्यूचा प्रकोप अधिक असतो. त्यामुळे प्रशासनाला धारेवर धरले जाते. यंदा तर पूर्वार्धात डेंग्यू कमी आणि स्वाइन फ्लूचे रुग्ण अधिक अशी स्थिती होती. जून-जुलै दरम्यान शहरात जानेवारीपासून स्वाइन फ्लूचे दीडशे रुग्ण आढळले आहेत, तर दहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेत बैठक घेतली. त्यावेळीदेखील शहरात डेंग्यूचे प्रमाण जास्त नव्हते, मात्र आता पावसाळा लांबला तसा डेंग्यूचा प्रभावदेखील वाढला आहे. जुलै महिन्यात डेंग्यूचे अवघे ४८ रुग्ण होते, तर आॅगस्ट महिन्यात ही संख्या ११७ वर गेली आणि सप्टेंबर महिन्यात आत्तापर्यंत १०५ रुग्ण आढळले आहेत. ही संख्या वाढतच आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यू रुग्णांची संख्या कमी असल्याचे सांगणाऱ्या प्रशासनाची मात्र अडचण झाली असून डेंग्यूशी किती आणि कसा सामना करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शहरातील डास प्रतिबंधक फवारणी आणि धुराळणी अनियमित झाली आहे. फवारणी तर अनियमित आहेच, परंतु डास खूप झाल्याची तक्रार झाल्यानंतर त्याठिकाणी धुराळणीची व्यवस्था केली जाते, अशा नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. महापालिका नागरिकांनाच दोषी धरत असून, घरांच्या गच्चीवर, टायर तसेच करंवट्या, घरातील फ्रिज, कुलर, फुलदाणी अशा अनेक ठिकाणी पाणी साचत असते, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यानेच डेंग्यू डासांची निर्मिती होत असून, त्यामुळे डेंग्यूचा प्रचार होत असल्याचे सांगितले जात आहे.
पेस्ट कंट्रोलचा ठेका अडकला आचारसंहितेत
जुन्या वादग्रस्त ठेकेदारालाच अधिकाधिक काम मिळावे यासाठी महापालिकेत सुरू असलेला अट्टाहास कामी आला. विलंबाने निविदा काढणे, त्याला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून पुन्हा निविदा मागविणे या घोळामुळे जुन्याच ठेकेदाराला आचारसंहिता संपेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जुन्याच ठेकेदाराकडून कामे करून घेतली जात आहे.