नाशिक : तालुक्यातील धोंडेगाव व दुगावला भेट देत मनरेगा अंतर्गत कामातुन गावातील स्थानिक मजुरांना रोजगार उपलबद्ध करुन देण्यासाठी समावेशक आराखडा तयार करण्याच्या सूचना ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना दिल्या.उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी मंगळवारी त्रंबकेश्वर व नाशिक तालुक्यातील धोंडेगाव व दुगाव येथे मनरेगाच्या कामासंदर्भात तसेच स्थानिक विविध विकास कामांसदर्भात भेट दिली. यावेळी दुगावच्या सरपंच पुष्पा जाधव व उपसरपंच संजय थेटे यांनी गावातील विविध समस्या संदर्भात माहिती दिली. गावातील ब्राम्हणी नदीवरील पूल हा पावसाळ्यात पाण्याखाली जात असल्याने या भागातील शेतकरी, कामगार, व विध्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यामुळे दोंन गावातील संपर्क तुटतो. यामुळे येथे नवीन अधिक उंचीचा पूल बांधावे, तसेच मनोली कडे जाणाºया पुलाचीही अवस्था बिकट झाल्याने त्याचीही दुरुस्ती अथवा नवीन बांधकाम करून देण्याची मागणी केली. खंडेराव टेकडी प्रस्तावित जल आणि मृद संधारण म. गां. रो. ह. यो. अंतर्गत पाहणी जागेची स्थळ पाहणी केली, तसेच मनोलीच्या डोंगर उतारावर विविध कामे जलसंधारणांतर्गत करता येतील का याबाबतचे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश उप मुख्य अधिकारी रवींद्र परदेशी यांनी ग्रामविकास अधिकारी यांना दिली. धोंडेगावात शिवारफेरी काढून तेथील विविध विकास कामे वयक्तिक व सामूहिक योजना संदर्भातील कामांचे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश ग्रामसेवकांना देण्यात आले. शिवार फेरीत रस्त्यांची कामे व विहिरींची कामे करण्यासंदर्भात सरपंच यांनी मागणी केली. याबाबत नियोजन करून सदरील प्रस्ताव लवकरात लवकर पाठविण्याच्या सूचना परदेशी यांनी दिल्या. यावेळी गावातील सरपंच यांनी वेगवेगळ्या विकास कामे करून देण्यासाठी आग्रह धरला. यावेळी दुगाव ग्रामपंचायतीचे सदस्य स्वाती फडोळ, विष्णू वाघ, शशिकांत वाघ, वसंत गायकवाड, गटविकास अधिकारी सारिका बारी, विस्तार अधिकारी सोनवणे,धोंडेगावचे सरपंच बेंडकोळी, पोलीस पाटील सोमनाथ बेंडकोळी आदी उपस्थित होते.