देशवंडी, जायगाव शिवारात घरांची पडझड, खांब वाकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:11 AM2021-05-31T04:11:11+5:302021-05-31T04:11:11+5:30
नायगाव खोऱ्यात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी झालेल्या जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. या वादळी वाऱ्याने ...
नायगाव खोऱ्यात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी झालेल्या जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. या वादळी वाऱ्याने देशवंडी येथे अनेक घरे जमीनदोस्त झाल्याने सुमारे २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाले. घराची भिंत व पत्रे पडून तुकाराम ज्ञानेश्वर डोमाडे, आशाबाई रामचंद्र बर्के, अलका ज्ञानेश्वर डोमाडे जखमी झाले आहेत.
या वादळी वाऱ्यात देशवंडी येथील मधुकर वाळीबा डोमाडे, काशिनाथ रामचंद्र बर्के, हेमंत ज्ञानेश्वर डोमाडे, मधुकर मानू घुगे, भगवान तुकाराम बर्के, दत्तात्रय बाळकृष्ण घुगे, रामकृष्ण दामू बर्के, जगन वाळिबा डोमाडे, सुदाम रामभाऊ कापसे, पंढरीनाथ जयराम कापडी, सचिन झुंबर कर्डक तर जायगाव येथील पुंडलीक नागू काकड आदी शेतकऱ्यांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रविवारी सकाळी तलाठी राहुल देशमुख, सरपंच दत्ताराम डोमाडे, भाऊराव कापडी, सुभाष बर्के आदींसह ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी देशमुख यांनी सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असल्याचे सांगितले. दरम्यान, या वादळामुळे महादेव मंदिर परिसरातील प्राथमिक शाळेची भिंत पडून शाळेचेही नुकसान झाले आहे.
इन्फो
ढिगाऱ्याखालील युवकाला वाचवले
शनिवारी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे घरांचे छप्परासह घराची भिंत अंगावर पडून डोमाडे वस्तीवरील तुकाराम डोमाडे हा युवक ढिगाऱ्यात अडकून पडला होता. भिंत पडल्याचा आवाज ऐकून घरातील लोकांनी आरडाओरडा करून शेजारील लोकांच्या मदतीने तुकारामला बाहेर काढले. भिंत पडल्यानंतर काही वेळातच वारा व पाऊस थांबल्यामुळे या युवकाला बाहेर काढता आले. दैवबलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले.
फोटो - ३० देशवंडी रेन
सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथील घराची झालेली पडझड.
===Photopath===
300521\30nsk_14_30052021_13.jpg
===Caption===
सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथील घराची झालेली पडझड.