एकलहरे : येथील सिद्धार्थनगर चौकातील मुख्य रस्त्यावर दरसोमवारी भरणारा आठवडाबाजार कोरोनाच्या कालावधीत बंद करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीमार्फत देण्यात आल्या असूनही भाजीपाला व अन्य विक्रेते दरसोमवारी आपली दुकाने थाटून व्यवसाय करीत असून, ग्रामपंचायतीलादेखील ते जुमानत नसल्याची तक्रार केली जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सर्व आठवडाबाजार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, कुठल्याही शासकीय परवानगीशिवाय एकलहरे गेटवर दरसोमवारी आठवडाबाजार भरत असून, यासाठी ग्रामपंचायतीने मूक संमती दिली की काय, अशी चर्चा होऊ लागली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वी येथे मोठ्या प्रमाणात भाजीपाला व अन्य विक्रेते आपला व्यवसाय करण्यासाठी स्थानिकांसह जेल रोड, नाशिक रोड, विहितगाव व आजूबाजूच्या खेड्यांतील लहानमोठे व्यापारी आपली दुकाने थाटत. त्यामुळे येथे रहदारीस अडथळा निर्माण होऊन काही वेळा हमरीतुमरीचे प्रसंग उद्भवले आहेत. यापूर्वी ग्रामपंचायतीच्याच काही सदस्यांनी कोरोनाचा फैलाव होईल म्हणून या बाजाराला विरोध केला होता. पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते. मात्र, काहीही परिणाम झाला नाही. स्थानिक विक्रेत्यांनाच फक्त परवानगी देण्यात आली असल्याचे ग्रामपंचायतीचे कारभारी सांगत असले, तरी येथे बाहेरील विक्रेत्यांचीच जास्त गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विक्रेत्यांना नोटिसा देऊन निर्बंध घालण्यात आले असले, तरीही काहीच फरक पडत नसल्याने गेल्या सोमवारी पुन्हा पोलिसांची गाडी बोलवावी लागली. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच विक्रेत्यांनी येथून काढता पाय घेतला.
कोट-----
- ग्रामपंचायतीने कोरोनाकालावधीत वारंवार सूचना व नोटिसा देऊनही सोमवारी भाजी व इतर घरसामान विक्री करणारे विक्रेते व्यवसायासाठी येतात. स्थानिक विक्रेत्यांपेक्षा बाहेरील विक्रेत्यांची गर्दी मोठी असते. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची भीती आहे. त्यामुळे गेल्या सोमवारी पोलिसांना पाचारण करावे लागले.
- विश्वनाथ होलीन, ग्रामपंचायत सदस्य, एकलहरे