विकसन परवानग्या मिळणार आॅनलाइन
By admin | Published: October 14, 2016 12:28 AM2016-10-14T00:28:19+5:302016-10-14T00:28:43+5:30
स्थायीची मंजुरी : येत्या सहा महिन्यांत प्रणाली कार्यान्वित
नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागात आता विविध विकसन परवानग्या घेण्यासाठी खेटा घालण्याची वेळ येणार नाही, ना अग्निशमन विभागाकडे ना हरकत दाखल्यासाठी छळवणूक होणार. नगररचना विभागामार्फत विविध विकसन परवानग्या आॅनलाइन उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत आॅनलाइन संगणकीय कार्यप्रणाली कार्यान्वित होऊन नागरिकांना सुलभ सेवा उपलब्ध होणार आहे.
नगररचना विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध विकसन परवानग्यांकरिता आॅनलाइन संगणकीय कार्यप्रणाली विकसित करण्याचे काम पुणे येथील मे. सॉफ्टटेक इंजिनिअरिंग प्रा. लिमिटेड यांच्याकडून करून घेण्यासाठी एक कोटी ३३ लाख रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीवर मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. स्थायी समितीने सदर प्रस्तावाला विनाचर्चा मान्यता दिली. या प्रस्तावानुसार, येत्या काळात इमारत आराखडा मंजुरीकरिता अर्ज व नकाशे आॅनलाइन सादर करण्याची सुविधा प्राप्त होणार आहे.
आॅनलाइन नकाशा सादर झाल्यानंतर सदर नकाशाची संगणकीय कार्यप्रणालीद्वारे तपासणी होऊन सदर बांधकाम परवानगीसाठी सादर करण्यात आलेला नकाशा हा नियमानुसार आहे किंवा नाही याबाबतचा छाननी अहवाल त्वरित प्राप्त होणार आहे. सादर करण्यात आलेल्या नकाशाचे फ्लोअर एरिया कॅल्क्युलेशन व एफएसआयबाबतची तपासणीही संगणकीय कार्यप्रणालीद्वारे शक्य होणार आहे. इमारत आराखडा मंजुरी प्रस्तावाच्या प्रत्येक टप्प्याची माहितीची उपलब्धता होणार आहे.
अर्जदारांकरिता पारदर्शक व सुलभ अशी इमारत आराखडा मंजुरी प्रस्ताव योजनाही असून, ड्रॉर्इंगनुसार इमारत आराखडा प्रस्तावाची बांधकाम नियमावलीनुसार स्वयंचलित छाननी प्रक्रिया पार पाडता येणार आहे. बांधकाम नकाशा मंजुरी प्रक्रिया व पूर्णत्वाच्या दाखल्याची प्रक्रिया जलदगतीने होणार असून, मंजुरी प्रक्रिया प्रत्येक टप्प्यावर संबंधितांना एसएमएसद्वारे कळविली जाणार
आहे.
नगररचना विभागाकडून स्थळ, भेटीची वेळ, दिनांकही एसएमएसद्वारे कळविली जाईल. सर्व प्रकारचे शुल्क (सुरक्षा अनामत, विकासनिधी) आदि आॅनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. स्थायीच्या मंजुरीनंतर सदर कार्यप्रणाली कार्यान्वित होण्यास सहा महिन्यांचा अवधी जाणार आहे. (प्रतिनिधी)