त्र्यंबकेश्वर : दर दहा वर्षांनी तयार होणारा शहर विकास आराखडा शासनाकडे पाठवून सुमारे १४ महिन्यांचा कार्यकाळ उलटला तरी अद्याप आराखडा मंजुरीला मुहूर्त लाभलेला नाही. मंजुरीसाठी दीड वर्षांचा कालावधी निघून गेला असून येत्या काळात लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहिता लागणार आहेत. त्यामुळे उर्वरित वर्षात कशी कामे होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.त्र्यंबकेश्वर शहराची विकास योजना (डेव्हलपमेंट प्लॅन) नगरविकास मंत्रालयाच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत लटकल्याने शंकांचे काहुर निर्माण झाले आहे. डिपी मंजुरीस होत असलेल्या विलंबाने आरक्षणात असलेल्या जागा सोडवून देणारे तथाकथीत एजंट तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संत निवृत्तीनाथ यात्रोत्सवाच्या महापुजेसाठी पालकमंत्री गिरीश महाजन आले असता त्यांनी देखील विकास आराखड्यातील कामांच्या दृष्टिने डिपी तातडीने मंजुर होण्याची निकड आपल्या भाषणात व्यक्त केली होती. नगर पालिकेचा ठराव होऊनही आता पावणे दोन वर्ष उलटली आहेत. नगर रचना विभागाने आॅगस्ट २०१६ मध्ये सर्वप्रथम प्रारूप योजना तयार करून नगर पालिकेच्या ठरावासाठी पाठविण्यात आली होती. त्यानंतर नागरिकांच्या हरकती मागवून त्यांची सुनावणी घेण्यात आली. त्यापुढील डिपीचा प्रवास मात्र अडथळ्यांची शर्यत ठरला आहे. मुख्याधिकारी यांनी ६ मे २०१७ रोजी डिपी मध्ये तत्कालीन नगराध्यक्षांच्या पतींनी हस्तक्षेप केल्याचा ठपका ठेवून जिल्हाधिकारी यांना पत्र दिले व नगर पालिका सभागृहाचा ठराव नामंजुर करण्याची शिफारस केली. दरम्यान नगराध्यक्ष बदलले गेले. डिपीच्या हस्तक्षेपाचा वाद थेट विभागीय आयुक्तांकडे गेला. त्यानंतर आॅगस्ट २०१७ मध्ये पुन्हा डिपीचा ठराव झाला. सप्टेंबर २०१७ मध्ये हरकती सुनावणी नंतर झालेले बदल दर्शविणारा नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ प्रसिध्द करण्यात आला. त्यानंतर नाशिक आणि तेथून पुढे पुणे नगर रचना कार्यालय व तेथून नगर विकास मंत्रालय असा प्रवास पुर्ण झाला आहे. तथापि जवळपास वर्षभरापेक्षा अधिक कालावधी केवळ नगर रचना मंत्रालयाच्या स्वाक्षरी करिता वाट पहावी लागत आहे.
त्र्यंबकेश्वरचा विकास आराखडा अडगळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 3:43 PM
शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा : विकास कामांना अडथळे
ठळक मुद्देजवळपास वर्षभरापेक्षा अधिक कालावधी केवळ नगर रचना मंत्रालयाच्या स्वाक्षरी करिता वाट पहावी लागत आहे.