‘पायी दिंडी’ आंदोलनात सहभागी झालेले पात्रताधारक.
देवगाव : पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे पात्र झालेल्या डीएड, बीएड पात्रताधारकांना राज्य सरकारने शिक्षक भरतीला विशेष परवानगी देऊन पुढील याद्या तत्काळ जाहीर कराव्यात या प्रमुख मागणीसाठी डीटीएड, बीएड स्टुडंट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने पायी दिंडी आंदोलनाला सुरुवात झाली.पायी दिंडी आंदोलन औरंगाबाद ते मुंबई मंत्रालय पायी कँडल मार्च सुरू असणार आहे. आंदोलनाच्या दहाव्या दिवशी ही दिंडी इगतपुरी येथे दाखल झाली. यावेळी देवगाव परिसरातून डीटीएड, बीएड, बेरोजगार पात्रताधारक शिक्षकांनी या दिंडीत सामील होऊन पायी दिंडीस पाठिंबा दर्शविला. शासनाने शिक्षकांची पदे भरण्यासाठी जाहिरात दिली होती. त्यामध्ये पात्रताधारकांची भरती केली. परंतु बाकीची रिक्त पदे भरण्यासाठी निरर्थक कारणे समोर ठेऊन ही भरती अडकून ठेवली आहे. या गोष्टींचा विरोध करण्यासाठी औरंगाबाद येथून या पायी दिंडीला सुरुवात होऊन मंत्रालयावर धडकणार आहे. राज्यातील लाखो डीटीएड, बीएडधारक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या मागण्या सरकारपुढे मांडत आहे. मात्र, सरकार त्या मागण्यांना प्रतिसाद देत नाही. डीटीएड, बीएड स्टुडंट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संतोष मगर, उपाध्यक्ष संदीप कांबळे, जीवन काकडे,विजय घुगे, तुषार शेटे या अभियोग्यताधारकांनी संघटनेच्या वतीने दिंडीत सहभागी झाले आहेत.