नाशिक: निर्बंधामुळे बसेस पूर्ण क्षमतेने धावत नसल्यातरी आता प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने डिझेलचे नियोजन करून बसेस रस्त्यांवर धावत आहेत. ग्रामीण भागातील बसेसच्या फेऱ्या कमी झालेल्या असल्या तरी डिझेलच्या कमतरतेमुळे केवळ लांबपल्ल्याच्या गाड्यांसाठीच डिझेलचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे अनेकदा एका बसचे डिझेल काढून दुसऱ्या बसला वापरले जात आहे.
बसेस काही प्रमाणात सुरू झालेल्या असल्या तरी अद्यापही अपेक्षित उत्पन्न मिळू शकले नसल्याने महामंडळाकडून खर्चाला कात्री लावण्यात आलेली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पैसे नसल्याने डिझेलमध्येही काटकसर केली जात आहे. त्यामुळे डिझेलचे नियोजन करूनच बसेस सोडल्या जात आहेत.
--इन्फो--
कमी उत्पन्न असेल तर वेटिंग
कमी उत्पन्न देणाऱ्या बसेसला डिझेल देण्यासाठी वेटिंगला ठेवले जात आहे. जास्त उत्पन्न देणाऱ्या बसेसला डिझेलला देण्याला प्राधान्य दिले जात आहे. असलेल्या डिझेलचे नियोजन करताना लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे अनेक बसेस आगारात उभ्या करण्याची वेळ आली आहे.
--इन्फो--
५३२
बसेस धावल्या
प्रवासी वाहतुकीला प्रतिसाद लाभत असल्याने सातत्याने बससेची संख्या देखील वाढत आहे. १७ ऑगस्ट रोजी सर्वाधिक ५३२ बसेस धावल्या. गेल्या ७ जूनपासून सुरू झालेल्या वाहतुकीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या १० तारखेला ४६३ बस धावत होत्या तर १७ तारखेला ५३२ धावल्या. गेल्या दहा दिवसांपासून सातत्याने बसेसच्या संख्येत वाढ होत असल्याने डिझलचे नियोजन त्यानुसार केले जात आहे. पुढील काळात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बसेसची संख्या अधिक वाढणार असल्याने त्यादृष्टीने डिझेलचे नियोजन केले जात आहे.
--इन्फो--
राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात डिझेलच्या नियोजनामुळे जिल्ह्यातील १३ आगारांमध्ये ६० टक्के बसेस सुरू आहेत. उर्वरित बसेस आगारात उभ्या असल्या तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील त्यांच्या फेऱ्या पूर्ण करण्यासाठीचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे सध्या सर्वच नियते सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील उत्पन्नातही वाढ होत आहे. गेल्या दहा दिवसांत बसेसची संख्या वाढत गेली आहे.