दिंडोरीत डॉ. भारती पवार यांचा विजय ; भाजपने राखला चौथ्यांदा गड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 02:20 AM2019-05-24T02:20:59+5:302019-05-24T02:21:24+5:30
जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार यांनी राष्टÑवादी कॉँग्रेसचे उमेदवार धनराज महाले यांचा मोठ्या मताधिक्याच्या फरकाने दणदणीत पराभव केला.
नाशिक : जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार यांनी राष्टÑवादी कॉँग्रेसचे उमेदवार धनराज महाले यांचा मोठ्या मताधिक्याच्या फरकाने दणदणीत पराभव केला. भारती पवार यांच्या रूपाने जिल्ह्यातून पहिल्यांदाच महिला खासदार संसदेत जाऊन पोहोचली आहे. भारती पवार यांना ५ लाख ६७ हजार ४७० मते मिळाली, तर राष्टÑवादीचे धनराज महाले यांना ३ लाख ६८ हजार ६९१ मते मिळाली. माकपाचे उमेदवार जीवा पांडू गावित यांना १ लाख ९ हजार ५७० मते मिळविता आली. वंचित आघाडीचे उमेदवार बापू बर्डे ५८ हजार ८४७ मते घेत चौथ्या क्रमांकावर राहिले. पवार यांच्या विजयाने भाजपने सलग चौथ्यांदा गड राखला आहे.
दिंडोरी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी आठ वाजता अंबडच्या सेंट्रल वेअर हाउस येथे निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश सागर यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय १४ अशा प्रकारे दिंडोरी मतदारसंघासाठी ८४ टेबल्स लावण्यात आले होते. तत्पूर्वी सकाळी सहा वाजेपासूनच मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मतमोजणी केंद्रात आगमन झाल्याने कोणत्या टेबलवर कोण अधिकारी, कर्मचारी असेल ते संगणकीय प्रणालीने जाहीर करण्यात आले व प्रत्येकाला आपल्या टेबलवर आसनस्थ करण्यात आले. आठ वाजेच्या ठोक्याला उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसमक्ष निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्रॉँग रूमचे सील काढण्यात आले. त्यानंतर पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सुरू करण्यात आली. त्यासाठी दोन टेबल स्वतंत्र लावण्यात आले. यंदा पोस्टल मतपत्रिकांना बारकोड असल्यामुळे व प्रत्येक मतपत्रिकेचे स्कॅनिंग करण्याचे आयोगाचे आदेश असल्याने अत्यंत काळजीपूर्वक या मतपत्रिका मोजण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आयोगाच्या आदेशाने ईव्हीएमची मतमोजणी सुरू करण्यात आली.
दिंडोरी मतदारसंघात १७ लाख २८ हजार ६५१ मतदारांपैकी ६५ टक्के म्हणजे ११ लाख ३४ हजार ७१९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपच्या डॉ. भारती पवार यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. ही आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली. दिंडोरी मतदारसंघात ८ उमेदवार असल्याने मतमोजणीच्या कामाने वेग घेतला. त्यामुळे सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत २५ फेºया पूर्ण झाल्या होत्या. भाजपच्या भारती पवार यांचा विजय प्रत्येक फेरीगणिक निश्चित होत गेला आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन त्याचे रूपांतर जल्लोषात होत गेले. भारती पवार यांच्या नाशिकमधील निवासस्थानीही कार्यकर्त्यांनी गर्दी करून आनंदोत्सव साजरा केला तर भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष करत मोदींच्या नावाचा जयघोष केला. पवार यांच्या दळवट गावीही ग्रामस्थांनी विजयाचा जल्लोष करीत पवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला.
ए.टीं.चे स्वप्न स्नुषेने केले पूर्ण
स्व. ए. टी. पवार यांनी १९७१ मध्ये लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्यावेळी भारतीय राष्टÑीय कॉँग्रेसचे उमेदवार झामरू मंगळू कहांडोळ यांनी पवार यांचा पराभव केला होता. पवार यांनी भारतीय क्रांती दलाच्या वतीने लोकसभा निवडणूक लढविली होती. ए.टीं.ची खासदारकीची इच्छा अपूर्णच राहिली. परंतु, तब्बल ४८ वर्षांनंतर ए.टीं.चे स्वप्न त्यांची स्नुषा भारती पवार यांनी पूर्ण केले.
भारतीय जनता पार्टीने सलग चौथ्यांदा दिंडोरीचा गड राखला आहे. तर आजवर पाच वेळा या मतदारसंघावर आपला कब्जा केला आहे. १९९६ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदा या मतदारसंघातून कचरू भाऊ राऊत यांच्या माध्यमातून विजय संपादन केला होता. त्यानंतर २००४, २००९ आणि २०१४ मध्ये भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी हॅट्ट्रिक साधली होती. आता पाचव्यांदा गड राखला आहे.
धनराज महाले यांच्या पराभवाची ५ कारणे
युती होण्याची चाहूल लागल्याने राष्टवादीची धरलेली वाट आणि पक्षांतर्गत नाराजीचा फटका
राष्टÑवादीचे बालेकिल्ले असलेल्या नांदगाव आणि येवला येथे मताधिक्य मिळविण्यात अपयश
महाआघाडीत माकपा आणि वंचित आघाडीचा समावेश न झाल्याने मतविभागणीचा फटका
भाजपातील नाराजांकडून व पूर्वाश्रमीच्या पक्षसहकाºयांकडून मिळू न शकलेली मदत
भाजप उमेदवारासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद मोदी यांनी सभा घेतल्याने बदलले समीकरण
जनतेने दिलेला कौल मान्य
जनतेने दिलेला कौल मान्य आहे. या निवडणुकीत पराभूत झालो असलो तरी जनतेचे आभार मानण्यासाठी दौरा करणार आहे. मतदारसंघातील कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीला मी धन्यवाद देतो. मला वारसा आहे, त्याचा निश्चितच उपयोग होईल. - धनराज महाले, राष्टवादी
कारणे विजयाची
राष्टवादी कॉँग्रेसने डावललेली उमेदवारी पथ्यावर पडल्यानेच विजय सुकर.
मतदारांशी सातत्याने संपर्क आणि उमेदवारी नाकारल्याची सहानुभूती.
जिल्हा परिषद सदस्यपदाच्या माध्यमातून केलेली विकासकामे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मतदारसंघात जाहीर सभा झाल्याने मिळाले पाठबळ.
दिवंगत माजी मंत्री ए. टी. पवार यांची स्नुषा म्हणून मतदारांचा मिळालेला कौल.
राष्टवादीला मिळाला इशारा
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी नांदगाव, येवला आणि दिंडोरी या मतदारसंघात राष्टÑवादीचे आमदार आहेत. त्यातही येवला मतदारसंघात राष्टवादीचे हेवीवेट नेते छगन भुजबळ तर नांदगावी त्यांचे पुत्र पंकज भुजबळ आमदार आहेत. त्यानंतर दिंडोरी हा राष्टवादीचा सुरक्षित मतदारसंघ मानला जातो; परंतु या तीनही मतदारसंघात भारती पवार यांनी लक्षणीय मते घेतल्याने तो राष्टवादीला इशाराचा मानला जात आहे.
चव्हाणांच्या नाराजीची मात्रा चालली नाही
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना उमेदवारी नाकारत ऐनवेळी राष्टÑवादीतून भाजपत दाखल झालेल्या डॉ. भारती पवार यांना उमेदवारी बहाल करण्यात आली. त्यामुळे चव्हाण यांनी नाराजीचा सूर प्रकट करीत पालकमंत्र्यांवरही आरोप केले होते. याशिवाय, त्यांच्या समर्थकांनी बोलाविलेल्या मेळाव्यातही जे. पी. गावित यांच्या सुपुत्राने हजेरी लावल्याने चव्हाणांच्या नाराजीचा फटका पवार यांना बसणार अशा अटकळी बांधल्या जात होत्या. परंतु, चव्हाण यांची नाराजीची मात्रा चालली नसल्याचे दिसून आले.
नाव पक्ष मते
डॉ. भारती पवार भाजप 567470
धनराज महाले राष्टÑवादी 368691
जे. पी. गावित माकपा 109570
अशोक जाधव बसपा 7703
बापू बर्डे वंचित आघाडी 58847
दादासाहेब पवार अपक्ष 5754
दत्तू बर्डे अपक्ष 5631
टी. के. बागुल अपक्ष 4502
नोटा ---- 9446