अझहर शेख, नाशिक : आपल्या मातृभूमीचा अभिमान हा प्रत्येकालाच असतो. मूळ भारतीय असलेल्या; मात्र नोकरी-व्यवसायानिमित्त लंडनमध्ये स्थायिक महिलांनी नॅशनल ‘हँडलूम डे’चे औचित्य साधत भारताच्या विविध राज्यांमधील महिला पारंपरिक वेशभूषा परिधान करून लंडन येथील ऐतिहासिक व प्रतिष्ठित ट्रॅफल्गार स्क्वेअर येथे एकत्र आल्या. तेथून प्रथमच ‘साडी वॉकेथॉन’ला प्रारंभ करण्यात आला. यावेळी लंडनच्या भूमीत भारतीय संस्कृतीचे नारीशक्तीने दर्शन घडविले.
लंडनमध्ये प्रथमच ‘ब्रिटिश वूमन इन सारी’ या संस्थेच्या (बीडब्ल्यूआयएस) डॉ. दीप्ती जैन यांच्या नेतृत्वाखाली साडी वॉकथॉनच्या कार्यक्रमाचे रविवारी (दि. ६) आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण वॉकथॉनमध्ये, लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या सुमारे ६०० भारतीय महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. या वॉकेथॉनमध्ये देशप्रेमाची भावना तर होतीच; मात्र सामाजिक बांधिलकीही होती. वॉकेथॉनद्वारे जमा होणारा सर्व निधी भारतातील विणकर बांधवांच्या हितासाठी खर्च करण्यात येणार असल्याचा दावा या संस्थेने केला आहे. ‘ब्रिटिश वूमन इन सारी’ संघटनेमधील महिलावर्ग हँडलूम साड्यांचे प्रदर्शन व भारतीय संस्कृतीची ओळख जगाला पटवून देण्याचे काम करीत आहेत.
विविध राज्यांमधील महिला पारंपरिक वेशभूषा परिधान करून लंडन येथील ऐतिहासिक ‘ट्रफल्गार स्क्वेअर’ येथे जमल्या. लंडनमधील स्थानिक वेळेनुसार, दुपारी एक वाजता या वॉकथॉनचा प्रारंभ झाला. महाराष्ट्रातील महिलांनी पारंपरिक लावणी नृत्य व गायन केले. तसेच ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष केला. हे वॉकथॉन ट्रॅफल्गार स्क्वेअरपासून सुरू होऊन ब्रिटनच्या पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या १०, डाउनिंग स्ट्रीट येथे पोहोचले.
भारतीय एकात्मतेचा लंडनवासीयांना अनुभव
वॉकेथॉनच्या समारोपप्रसंगी सहभागी भारतीय महिलांनी भारतातील विविधतेतील एकात्मतेचे दर्शन घडविले. यावेळी ‘काश्मीर तू, मैं कन्याकुमारी’, दक्षिणेमधील राज्यांनी ऑस्कर पुरस्कृत ‘नाटू नाटू’ व ‘टम टम,’ उत्तरेकडील राज्यांनी ‘भूमरो भूमरो’, पश्चिमेकडील राज्यांनी ‘घुमर, घुमर’ तसेच पूर्वेकडील राज्यांनी ‘फागूणेर मोहानी’ अशा विविध गीतांवर लोकनृत्य सादर करत लंडनवासीयांचे लक्ष वेधले.
राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन
वॉकथॉनचा समूह लंडनच्या वेस्टमिन्स्टरमधील ऐतिहासिक पार्लमेंट स्क्वेअर येथे पोहोचला. तेथे असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रगीत गायन करण्यात आले. तसेच गांधीजींचे आवडते भजन, ‘वैष्णव जन तो’ यावर शास्त्रीय नृत्य सादर करण्यात आले. प्रत्येक राज्यामधील महिलांनी पारंपरिक नृत्य सादर केले.
सातासमुद्रापार वास्तव्यास असलेल्या लोकांमध्ये भारतीय हातमाग व हस्तनिर्मित दागिन्यांप्रती जागरूकता निर्माण करणे हा मुख्य उद्देश होता. परदेशात आम्ही राहतो आणि आपल्या भारताची संस्कृती, परंपरा, सण-उत्सवांची नेहमीच आठवण येते. यानिमित्ताने अशा कार्यक्रमांद्वारे आमच्या मुलांनाही भारतीय संस्कृतीची जवळून ओळख होते आणि प्रेरणाही मिळते. वॉकेथॉनने संपूर्ण भारताच्या महिलांना एकत्रित लंडनमध्ये बघून अभिमान वाटला.
- मधुरा शुक्ला, मूळ नाशिककर.
१५ वर्षांपासून इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहे. वॉकेथॉनमध्ये महाराष्ट्रातील जवळपास ५० महिलांनी प्रसिद्ध हँडलूम्सचे अतिशय दिमाखदार प्रदर्शन केले. पैठणी, दक्षिण महाराष्ट्रातील नारायणपेठ साडी व खणाचे ब्लाउज तसेच भंडारा येथील कोसा सिल्क वगैरेंचा समावेश होता. तसेच या महिलांनी पारंपरिक दागिने, नऊवारी साडी आणि भगवा फेटा अतिशय हौसेने घालून या वॉकेथॉनमध्ये सहभाग घेतला. त्यांनी वेस्टमिन्स्टरमधील पार्लमेंट स्क्वेअरमध्ये ‘नाचू किती, नाचू किती, कंबर लचकली’ ही पारंपरिक लावणी नृत्य सादर केले.
- अनुजा हुडके-जाधव, मूळ पुणेकर.