अपंगत्व आजार नव्हे एक स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 01:08 AM2019-03-09T01:08:55+5:302019-03-09T01:09:16+5:30
सहानुभूतीच्या स्पर्शातून सतत अपंगत्वाची जाणीव करून देणाऱ्या हातांमुळे मनाला होणारी इजा अधिक वेदनादायी असते. अपंगत्व ही कोणती व्याधी अथवा आजार नव्हे तर ती एक स्थिती हे समाजाला सांगण्याची अजूनही गरज असल्याचे प्रतिपादन सोनाली नवांगूळ यांनी केले.
नाशिक : सहानुभूतीच्या स्पर्शातून सतत अपंगत्वाची जाणीव करून देणाऱ्या हातांमुळे मनाला होणारी इजा अधिक वेदनादायी असते. अपंगत्व ही कोणती व्याधी अथवा आजार नव्हे तर ती एक स्थिती हे समाजाला सांगण्याची अजूनही गरज असल्याचे प्रतिपादन सोनाली नवांगूळ यांनी केले. अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेच्या सरचिणीस नीलिमा पवार होत्या.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘कुसुमाग्रज स्मरण’ उपक्र मात कुसुमाग्रज स्मारकात आयोजित ‘मी ठरवलं तर’ या विषयावर नवांगूळ बोलत होत्या. बत्तीस शिराळा येथे अंगावर बैलगाडी कोसळून पॅराप्लेजिक प्रकारचे अपंगत्व आले. या अपघातात कंबरेखालचा भाग पूर्णत: संवेदनहीन झाला. या अपघातानंतरचा उपचार आणि जीवनाचा प्रवास त्यांनी उलगडून दाखविला. लहान वयात झालेल्या या अपघाताने संवेदनाच गमविल्यामुळे आयुष्याचा मोठा प्रश्न होता. मुंबईची हाजी अली हॉस्पिटलच्या अर्थोच्या वॉर्डात उपचाराबरोबरच नियंत्रणासाठीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळाल्याने काही प्रमाणात नैसर्गिक विधीच्या जाणिवा अनुभवता आल्या. आयुष्यात अशा प्रकारची संवेदना जाण आणि त्यातून शारीरिक आजार, जखमा बळावणे किती भयावह असते याविषयी त्यांनी केलेले अनुभव कथन अंगावर काटा आणणारे होते.
अपंगत्वाविषयी समाजाकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे अपंग व्यक्तीला सातत्याने परावलंबित्वाची जाणीव करून दिली जाते. ही मानसिकता बदलली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली, मात्र समाजात संवेदनशील व्यक्तीही असतात, असे डॉक्टर उपचारासाठी लाभल्याने अपंगत्वातून सावरण्यासाठी मदत झाली याविषयीची कृतज्ञताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. रंजना पाटील यांनी प्रास्ताविक केले.