नाशिक : नाशिक महापालिकेत भाजपाची सत्ता असल्यामुळेच विकासकामांत राज्यातील महाविकास आघाडीकडून भेदभाव केला जात असून, विकासकामांसाठी पुरेसा निधी दिला जात नसल्याने प्रसंगी केंद्र सरकारकडून निधी आणून प्रकल्प पुर्ण केले जातील असा दावा भाजप नेते व माजी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी केला आहे.
नाशिक महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. नाशिक शहर दत्तक घेण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यासाठी भरघोस निधी देवून त्यांनी आपला शब्द पुर्ण केला आहे. परंतु राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्य सरकार सुडबुद्धीने वागत असून, विकासकामे निधी अभावी अडवून ठेवली जात आहेत. असे असले तरी, भाजपाने शहराचा सर्वांगिण विकासाची कामे केल्याने त्याच बळावर पुन्हा येत्या महापालिका निवडणुकीत भाजपाचीच सत्ता येणार असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच महापालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपा कोणाकडूनही खंडण्या घेत नाही, असा टोला त्यांनी शिवसेनेचा नाव घेता लगावला. ते म्हणाले, शिवसेनेने त्यांच्या वल्गना बंद कराव्यात, बिहार निवडणूक लढविण्याचे जाहीर केले नंतर घुमजाव केले, आता बंगालच्या बाबतीतही तेच होत असून, लवकरच बंगालचे निकाल लागल्यानंतर त्यांना त्यांची जागा दिसेल असे सांगून, राम मंदिरासाठी भाजपा कुठलीही वर्गणी गोळा करीत नाही. रामजन्मभूमी न्यास व विश्व हिंदु परिषद यांना आम्ही मदत करीत असल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला.