नाशिक : शिक्षकांच्या वेतनाचे देयक तयार करणारी शालार्थ प्रणाली गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असल्यामुळे शिक्षकांचे जानेवारीचे वेतन लांबले आहे. कार्यप्रणाली कधी सुरू होणार याबाबतची कोणतीही माहिती नसल्याने शिक्षकांना वेळेत वेतन न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा महाराष्टÑ राज्य शिक्षक-शिक्षकेतर विकास संघटनेने दिला आहे. शासनाच्या शालार्थ प्रणालीच्या माध्यमातून शिक्षकांचे वेतन देयक शासनाकडे सादर केले जाते. मात्र गेल्या १३ जानेवारीपासून सदरच्या प्रणालीमध्ये बिघाड झाल्याने जानेवारीचे शिक्षकांचे वेतन अद्याप सादर करण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे याबाबत शासनाकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नसल्याने शिक्षकांची आर्थिक कोंडी होणार असल्याचे संघटनेचे नेते पुरुषोत्तम रकिबे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिक्षकांचे वेतन देयक आॅनलाइन पद्धतीने भरण्यासाठीची प्रक्रिया बंद असल्यामुळे अनेक शाळांना त्यांचे वेतन दाखल करता आलेले नाही. सर्व्हर दुरुस्तीला लागणारा वेळ पाहता यास विलंब होण्याची शक्यताच अधिक असल्याने शिक्षकांना एका महिन्याच्या पगाराची वाट पहावी लागणार आहे. अनेक शिक्षकांच्या पाल्यांचा शैक्षणिक खर्च, गृहकर्ज, विमा हफ्ते, आयकर भरणा करता येणार नसल्याने त्यांना आर्थिक फटका बसला आहे. तांत्रिक अडचण लक्षात घेता शिक्षकांचे वेतन आॅफलाइन करावे, अशी मागणी महाराष्टÑ राज्य शिक्षक-शिक्षकेतर विकास संघटनेकडून करण्यात आली आहे. शिक्षकांचे पगार येत्या १ फेब्रुवारी रोजी न झाल्यास आंदोलनाची भूमिका संघटनेने घेतली आहे. वास्तविक आयडीबीआय बॅँकेत शिक्षकांचे वेतन वर्ग झाल्यानंतर बॅँकेने शिक्षकांचे वेतन वेळेवर देण्याची हमी देताना शासनाकडून पैसे आले नाही तरी शिक्षकांचे वेतन रखडणार नाही, असे जाहीर केले होते. मात्र बॅँकेने अद्यापही कोणतीच भूमिका स्पष्ट केलेली नाही. १ तारखेपर्यंत आॅनलाइनची समस्या सुटली नाही तरी बॅँक मुंबईतील कर्मचाºयांचे वेतन अदा करणार आहे. याच धर्तीवर नाशिकमधीलही शिक्षकांचे वेतन अदा करण्यात यावे, अशी मागणी संघटनेचे राज्य सरचिटणीस दशरथ जारस, राज्याध्यक्ष पुरुषोत्तम रकिबे, जिल्हा सरचिटणीस सखाराम जाधव, जिल्हाध्यक्ष हिरामण शिंदे, महानगरप्रमुख एकनाथ पाटील, कार्यवाह अनिल रौंदळ, महानगर सरचिटणीस अविनाश हिरे, खजिनदार केशव सूर्यवंशी, दत्तू भोये आणि विजय बढे यांनी केली आहे.अनेक संघटनांची तयारी वेतनापासून वंचित असलेल्या अनेक शिक्षक संघटनांनी निवेदनाची तयारी चालविली आहे. खासगी प्राथमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाºयांच्या वतीनेदेखील शिक्षणाधिकाºयांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या शिक्षक संघटनांकडून देखील शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
वेळेत वेतन मिळत नसल्याने शिक्षक संघटनांमध्ये नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 12:46 AM