सिन्नर : तालुक्यातील वडझिरे येथील महिलेच्या नावे असलेल्या १२२ एकरपैकी २५ एकर शेतजमिनीची बनावट शपथपत्राच्या आधारे खोट्या वारसनोंदी करून परस्पर विक्र ी करून विल्हेवाट लावल्या प्रकरणी दहा जणांविरोधात सिन्नरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वडझिरे येथील २००८ मध्ये कार्यरत तलाठी, नाशिकरोड येथील गुप्ता नामक खरेदीदार व ठोंबरे कुटुंबातील आठ व्यक्तींचा आरोपींच्या यादीत समावेश आहे. योगेश देवराम ठोंबरे (३१) यांनी या फसवणुकी बाबतची फिर्याद दिली आहे. वडझिरे येथील शेती गट नं. १९२ व २१५ चे एकूण क्षेत्र १२२ एकर २९ गुंठे इतके होते. काळी रामा महार या महिलेच्या नावे असणाऱ्या या क्षेत्राला राही गोविंद भालेराव ही वारस असताना गोविंद राघो ठोंबरे यांचा राघोजी ठोंबरे या व्यक्तीशी काहीएक संबंध नसताना वरील मिळकतीवर बनावट शपथपत्र तयार करून व ते खरे आहे, असे भासवत तलाठ्याच्या मदतीने खोटी वारस नोंद करण्यात आल्याचे फिर्यादित म्हटले आहे. यात २५ एकर क्षेत्र तसेच शैलेश नरेश गुप्ता (रा. कुबेर भवन, नाशिकरोड) याला विक्र ी केली. तसेच गोरख रंगनाथ ठोंबरे, दगू वामन ठोंबरे, निवृत्ती चंदा ठोंबरे, काशीनाथ निंबा ठोंबरे, श्रीधर धोंडीराम ठोंबरे यांचा सदर मिळकतीवर संबंध नसताना त्यांना ठकूबाई हिचे पुतणे आहेत असे सांगून बनावट शपथपत्र तयार करून ते खरे आहे असे भासवून खोटी वारस करून बनावट हक्कसोड पत्र तयार करण्यात आले. भास्कर रंगनाथ ठोंबरे व चिंतामण भीमा ठोंबरे यांनी फिर्यादीचे वडील देवराम ठोंबरे, चुलते बाळू व अशोक ठोंबरे यांचा सदर मिळकतीशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही असे बनावट शपथपत्र तयार करून फसवणूक केली म्हणून वरील सर्व दहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट शपथपत्राच्या आधारे जमिनीची विल्हेवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:56 AM