पांगरी : वीज मंडळाकडून होणाऱ्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे वीज यंत्रणेचा पुन्हा बोजवारा उडाला असून, परिसरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.जिथे जलविद्युत निर्मिती होते अशी धरणे भरल्याने वीजटंचाई भासणार नाही असे वाटत होते. परंतु तरीही विजेचे भारनियमन केले जात असून तसेच वीज असते त्यावेळी अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देणे अवघड झाल्याने त्यातून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने विहीर, नदी, नाले, बंधारे भरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांचे म्हणजे गहू, मका तसेच जनावरांच्या चाऱ्याची लागवड केली आहे परंतु पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. अतिशय कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने एक वाफा भरण्याकरिता शेतकऱ्याला अर्धा तास लागत आहे.वीज खंडित होण्याचे प्रमाणही वाढल्याने वाफेपर्यंत पाणी पोहोचण्याच्या अगोदर वीज जाते त्यामुळे विहीर ते वाफेपर्यंत शेतकरी फेऱ्या मारून हैराण झाला आहे. त्यामुळे पाणी भरण्यासाठी आता दोन व्यक्तीची गरज भासू लागली आहे.वीजपुरवठा सुरू राहिला तर तो अत्यंत कमी दाबाने देण्यात येत असल्याने घरातील अनेक वीज उपकरणे सुरू होत नाहीत. त्यामुळे वीज असूनही तिचा उपयोग होत नाही. या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे घरगुती वापराच्या उपकरणाचे नुकसान, तसेच मोटार जळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शेतकऱ्याला शेतीसाठी रात्री वीज दिली जाते, परंतु ही दिली जाणारी वीज रात्री न देता दिवसा देण्याची मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आत्माराम पगार, बारकू पगार, बाबासाहेब शिंदे, विलास निरगुडे, अशोक शिंदे, दादासाहेब पांगारकर, नीलेश पगार आदींसह शेतकऱ्यांनी केली आहे.------------पांगरी व परिसरात गावामध्ये शेती तसेच घरगुती अत्यंत कमी दाबाने वीज दिली जात असून, वीज वारंवार खंडित होत असूनही वीज मंडळाकडून वीज बिल मात्र अखंडितपणे वसूल होत आहे. वीज बिल व इतर सर्व आकार सक्तीने वसूल केले जात असताना वीज कमी दाबाने का दिली जात आहे असा सवाल सर्वसामान्य करू लागले आहेत.- विश्वनाथ पगार, अध्यक्ष, वि. का. सोसायटी, पांगरी.ग्रामीण भागातील शेतीला सरकारने सलग वीजपुरवठा आणि तो दिवसा केला तर शेतीला पुन्हा ऊर्जितावस्था येऊ शकते. परंतु सरकारची तशी मानसिकता असायला हवी, दुर्दैवाने ती नाही. त्यामुळे स्वातंत्र्याची पाऊणशे वर्षे उलटून गेल्यानंतरही ग्रामीण भागातील भूमिपुत्र व शेतकरी आजही अंधारात चाचपडत आहेत.- रवी पगार, सदस्य पंचायत समिती, सिन्नर.
कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 6:58 PM
पांगरी : वीज मंडळाकडून होणाऱ्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे वीज यंत्रणेचा पुन्हा बोजवारा उडाला असून, परिसरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
ठळक मुद्देपांगरी : शेतकरी तसेच नागरिकांमध्ये तीव्र नाराजी