नाशिक : गेल्या १ मार्चपासून जिल्ह्यातील ई-पॉस मशीन्स सुरूच झालेल्या नसल्याने रेशनवरील धान्य वाटप यंत्रणा ठप्प झाली आहे. दरमहिन्याला एनआयसीकडून ई-पॉस मशीनसचा डाटा घेतला जातो. त्यासाठी काहीवेळ मशीन्स बंद ठेवल्या जातात. परंतु, आता गेल्या दहा-बारा दिवसांपासून मशीन्स बंद असल्यामुळे मार्च महिन्याच्या धान्यांचे वाटप अजूनही होऊ शकलेले नाही.
रेशन दुकानांच्या माध्यमातून ई-पॉस मशीन्सच्या साह्याने कार्डधारकांना नियमित धान्य पुरवठा केला जातो. या मशीन्सचा डाटा दरमहिन्याला एनआयसी एजन्सीकडून घेतला जातो. यासाठी ऑनलाइन पद्धतीने मशीन्सवरील डाटा घेणे आणि साठानिहाय अपलोड करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या कामासाठी गेल्या एक तारखेला मशीन्स बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. या मशीन्स अद्यापही सुरू होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे रेशनवरील धान्य वितरण होऊ शकलेले नाही. जिल्हा पुरवठा विभागाने मार्च महिन्यासाठी असलेल्या धान्यांचा पुरवठा रेशन दुकानांना केेला आहे. मात्र, यंत्रणा सुरू नसल्याने धान्यांचे वाटप होऊ शकलेले नाही. जिल्ह्यात २७०० रेशन दुकानांच्या माध्यमातून धान्य पुरवठा केला जातो. आतापर्यंत १२०४ दुकानांमध्ये मार्च महिन्याचे धान्य पोहोचलेले आहे. उर्वरित पुरवठा येत्या २० तारखेपर्यंत पूर्ण केला जाणार आहे.
जिल्ह्यात ६५,५९५ अंत्योदय, ८९,४१८ केशरी, ३,४३,५९० प्राधान्यक्रम कुटुंब तर २२,३४६ इतके पांढरे रेशनकार्डधारक आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील कार्डधारकांना रेशनवरून धान्य वाटप केले जाते. सर्वसामान्य आणि कष्टकऱ्यांना दरमहा रेशनवर मिळणाऱ्या धान्याचा मोठा आधार होतेा. धान्य वितरण व्यवस्था विस्कळीत झाल्यास त्याचा थेट परिणाम या कुटुंबांवर होत असतो. आताही अशा अडचणींचा सामना कार्डधारकांना करावा लागत आहे. मार्च महिन्याचे धान्य रेशन दुकानांमध्ये दाखल झालेले आहे. मात्र, अजूनही त्याचे वाटप होऊ शकलेले नाही.
ई-पॉस यंत्रणा पूर्ववत कधी होणार, याबाबतची कोणतीही माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आलेली नाही. दुकानदारांकडून देखील याबाबतची विचारणा केली जात आहे. तांत्रिक अडचण आल्यामुळे काहीसा विलंब होत असल्याचे खासगीत सांगितले जात आहे. मात्र, नेमके कारण अजूनही समजू शकलेले नाही. त्यामुळे ग्राहकांबरोबरच दुकानदारांनी देखील पुरवठा विभागाला याबाबतची सातत्याने विचारणा केली जात आहे.
===Photopath===
110321\11nsk_12_11032021_13.jpg
===Caption===
रेशनकार्ड