नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून लसीअभावी बंद पडलेले लसीकरण शनिवार (दि.०३) पासून पुन्हा सुरू होणार असून, नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी शुक्रवारी कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचे सुमारे ५७ हजार डोस प्राप्त झाले आहेत. दरदिवसाला ग्रामीण भागात ४० हजार नागरिकांचे लसीकरण केले जात असल्याने सदरचा साठा अवघ्या दोन दिवसांसाठीच पुरणार आहे. जानेवारी महिन्यापासून सुरू करण्यात आलेले कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची वाटचाल दिवसेंदिवस खडतर होत असून, प्रारंभी लसीकरणासाठी उदासीनता दाखविणाऱ्या नागरिकांनी आता मात्र लसीकरणासाठी केंद्रांवर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. नाशिक शहरासह ग्रामीण भागातही लसीकरणासाठी उडत असलेली झुंबड पाहता, त्या प्रमाणात लसींचे डोस उपलब्ध होत नसल्याने अनेकांना दररोज केंद्रांचे उंबरे झिजवावे लागत आहेत, तर ग्रामीण भागातही पहाटेपासून नागरिकांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे पुरेशा लसीअभावी आरोग्य खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अशातच गेल्या तीन दिवसांपासून बिगर आदिवासी तालुक्यांमध्ये एकही लसीकरण होऊ शकलेले नाही. सरकारकडून लस उपलब्ध नसल्याचे कारण त्यासाठी दिले जात आहे. मात्र, दुसरीकडे पेठ, सुरगाणा, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या चार आदिवासी तालुक्यांमध्ये अजूनही लसीकरणासाठी जागृती न झाल्यामुळे या तालुक्यांमध्ये पुरेशा लसी उपलब्ध आहेत.
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी शुक्रवारी ४३ हजार कोविशिल्ड व १४ हजार कोव्हॅक्सिन अशा ५७ हजार लसी उपलब्ध झाल्याची माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी यांनी दिली असून, शनिवारपासून बिगर आदिवासी तालुक्यांमध्ये या लसींचे वाटप होऊन लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकाच दिवसात सुमारे ४० हजार नागरिकांचे लसीकरण केले जाते. त्यामुळे उपलब्ध झालेल्या लसींचे प्रमाण पाहता पुढचे दोन दिवस या लसी पुरतील. मात्र, त्यानंतर पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.