युतीच्या जागावाटपात आकड्यांचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 02:03 AM2019-09-24T02:03:38+5:302019-09-24T02:04:05+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेनेत फिफ्टी फिफ्टीचा फार्म्युला लागू होणार की, सेनेला १२० जागा देत भाजपा १६० जागा लढविणार असे जागावाटपाचे वेगवेगळे आकडे जाहीर होत असताना निवडणुकीत युती झाल्यास नाशिक जिल्ह्णातही भाजप-सेनेचे जागावाटप कसे असेल,

 Ditch the alliance in place of the Alliance | युतीच्या जागावाटपात आकड्यांचा खोडा

युतीच्या जागावाटपात आकड्यांचा खोडा

googlenewsNext

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेनेत फिफ्टी फिफ्टीचा फार्म्युला लागू होणार की, सेनेला १२० जागा देत भाजपा १६० जागा लढविणार असे जागावाटपाचे वेगवेगळे आकडे जाहीर होत असताना निवडणुकीत युती झाल्यास नाशिक जिल्ह्णातही भाजप-सेनेचे जागावाटप कसे असेल, या विषयीची उत्सुकता ताणली गेली आहे. २००९ मध्ये झालेल्या युतीच्या १०-५ जागावाटप यंदा भाजप स्वीकारणार की, शिवसेना कमी जागा घेऊन भाजपला चाल देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या मोठ्या भावाच्या भूमिकेत वावरत असलेल्या भाजपकडून जिल्ह्णात आणखी दोन ते तीन अतिरिक्त जागांचा आग्रह धरला जात असून, त्यामुळे युतीच्या जागावाटपात आकडेच खोडा घालतील, असे दिसू लागले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच युतीचे जागावाटप निश्चित झाल्याचा दावा शिवसेना करीत असून, त्यावेळी ठरल्यानुसार विधानसभेच्या फिफ्टी फिफ्टी जागा दोन्ही पक्ष लढवतील तर सत्तेतही समान वाटा सेनेला दिला जाईल, असे ठरले असल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगितले जात आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी याची माहिती सर्वप्रथम प्रसिद्धी माध्यमांना दिली त्यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीही त्याचा पुनरुच्चार केला आहे. प्रत्यक्षात विधानसभेसाठी भाजप सेनेला निम्म्या जागा देण्यास तयार नसल्याचे बोलले जात असून, सेनेला १२० ते १२५ जागा देण्यास भाजप तयार असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे जागावाटपावरूनच युतीची अधिकृत घोषणा होत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे
आहे. राज्यपातळीवर जागावाटपात वेगवेगळे आकडे दररोज जाहीर होत असताना नाशिक जिल्ह्णातही भाजप व सेनेच्या इच्छुकांमध्ये जागा वाटपाच्या आकड्यांवरच चर्चा होत आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी युती तुटल्याने दोन्ही पक्षांनी पंधराही मतदारसंघांत उमेदवार उभे केले. परंतु यंदा अजून तरी युतीची चर्चा सुरू असल्याने कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील त्याविषयी उत्सुकता आहे. भाजप १०-५ चे सूत्र स्वीकारणार की, सेना आपल्या ताब्यातील जागा भाजपला सोडणार यावरून आकडेवारीचा खेळ मांडला जात आहे.
इच्छुकांकडून पक्षावर दबाव
सन २००९ मध्ये सेना-भाजप एकत्र लढल्यावर सेनेने दहा तर भाजपने पाच जागांवर निवडणूक लढविली होती. सेनेकडून जिल्ह्णाच्या जागावाटपात त्याच फार्म्युल्याचा आग्रह धरला जाण्याची शक्यता असली तरी, प्राप्त परिस्थितीत भाजपची जिल्ह्णात ताकद वाढल्याचे निमित्त करून भाजप पाच जागा घेण्यास तयार होणार काय असा प्रश्न आहे. भाजपने जिल्ह्णातील पंधराही मतदारसंघांत इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली असून, कळवण, नांदगाव, इगतपुरी मतदारसंघ पक्षाला मिळावे यासाठी इच्छुकांकडून पक्षावर दबाव आणला जात आहे.

Web Title:  Ditch the alliance in place of the Alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.