दिवाळीचे फटाके आवाजाच्या मर्यादेत
By admin | Published: October 14, 2016 12:02 AM2016-10-14T00:02:41+5:302016-10-14T00:07:09+5:30
विक्री ठिकाणांना नियमावली : कारवाईचा इशारा
नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधानुसार यंदाही दिवाळीच्या फटाक्यांना आवाजाची तसेच फटाके उडविण्याच्या वेळेवर बंधन घालण्यात आले असून, ठरवून दिलेल्या मर्यादेच्या पलीकडचे फटाके विक्री तसेच तयार करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढून त्यात मर्यादेची जाणीव करून दिली आहे. १२५ डेसिबल्स आवाजाच्या मर्यादापलीकडील फटाके वाजविता येणार नाहीत, त्यात साखळी फटाके, रॅकेट, अॅटम बॉम्ब, सुतळी बॉम्ब यांसारख्या मोठ्या आवाजाच्या फटाक्यांचा समावेश असून, याशिवाय प्रदूषणात भर घालणाऱ्या शोभेच्या दारूच्या फटाक्यांनाही बंधने घालून देण्यात आलेली आहेत. ध्वनी व वायू प्रदूषणाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध घालताना फटाक्याची विक्री करण्याबाबतही नियम ठरवून दिले आहेत. त्यात फटाके विक्रीच्या स्टॉलमध्ये सुरक्षित अंतर असावे, प्रत्येक स्टॉलमध्ये ५० ते ४०० किलो फटाक्यांपेक्षा अधिक फटाके ठेवता येणार आहेत. रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत फटाके उडविण्यावरील बंदीचाही यात समावेश आहे. यासंदर्भात घालून दिलेले नियम, निकषांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा तसेच फटाके विक्रीचा परवाना तत्काळ रद्द करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)