७० रुग्णालयांना लागले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:19 AM2018-04-22T00:19:56+5:302018-04-22T00:19:56+5:30
महापालिकेने केलेल्या आवाहनानंतरही नियमांची पूर्तता करू न शकलेली ३१९ रुग्णालये अनधिकृत ठरविण्यात आली आहेत. या रुग्णालयांना आता महापालिकेने रुग्णालय बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या असून, रुग्णांना दाखल करून घेऊ नये, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, ७० रुग्णालयचालकांनी आपली रुग्णालये बंद केल्याचे यापूर्वीच महापालिकेला कळविले आहे.
नाशिक : महापालिकेने केलेल्या आवाहनानंतरही नियमांची पूर्तता करू न शकलेली ३१९ रुग्णालये अनधिकृत ठरविण्यात आली आहेत. या रुग्णालयांना आता महापालिकेने रुग्णालय बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या असून, रुग्णांना दाखल करून घेऊ नये, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, ७० रुग्णालयचालकांनी आपली रुग्णालये बंद केल्याचे यापूर्वीच महापालिकेला कळविले आहे.
मुंबई शुश्रूषागृह अधिनियम १९४९ व सुधारित नियम २००६ नुसार महापालिका क्षेत्रातील रुग्णालये, नर्सिंग होम्स, प्रसूतिगृहचालकांनी महापालिकेकडे नोंदणी करणे व विहित कालावधित परवाना नूतनीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परवाना नूतनीकरणासाठी नगररचना व अग्निशामक विभागाचा ना हरकत दाखलादेखील असणे आवश्यक आहे. परंतु महापालिका क्षेत्रातील अनेक जुनी रुग्णालये, प्रसूतिगृह निवासी क्षेत्रात असल्यामुळे तसेच इमारतीच्या वापरात बदलाबाबत संबंधितांना ३१ मार्चच्या आत नोंदणी व नूतनीकरण सक्तीचे केले होते. मात्र, या कालावधित मनपा क्षेत्रातील ५८४ पैकी २६५ रुग्णालयांनीच परवाना नूतनीकरण केले. सुमारे ३१९ रुग्णालयांनी नियमांची पूर्तता न केल्याने त्यांना अनधिकृत ठरविण्यात आले. त्यानुसार, संबंधितांना रुग्णालय बंद करण्याच्या नोटिसाही काढल्या आहेत. या रुग्णालयात रुग्णांना दाखल करून घेऊ नये, अशा नोटिसा रुग्णालयांबाहेर लावल्या जात आहेत.
संशयास्पद केंद्रांना नोटिसा
गर्भलिंग निदान करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे धोरण महापालिकेने स्वीकारले आहे. त्यानुसार, शहरातील सोनोग्राफी तसेच गर्भपात केंद्रांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत २६८ पैकी १४२ सोनोग्राफी केंद्रांची तर १२३ पैकी ४८ गर्भपात केंद्रांची तपासणी करण्यात आली असून, संशयास्पद आढळलेल्या दोन सोनोग्राफी केंद्रांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली.