नेत्यांचे राजकारण नको, नागरीकांना दिलासा हवाय!
By संजय पाठक | Published: May 6, 2021 03:07 PM2021-05-06T15:07:28+5:302021-05-06T15:11:19+5:30
नाशिक- राजकारण कुठे आणि किती करावे याला ही मर्यादा आहेत. परंतु सध्या नाशिक महापालिकेच्या निवडणूकांच्या तोंडावर सर्वांनीच तीलांजली दिल्याचे दिसत आहे. डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयातील ऑक्सीजन गळतीनंतर सुरू झालेले आरोप प्रत्यारोप थांबण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे आता प्रकरण गंभीर होत चालले आहे. रूग्णांना दिलासा देण्याऐवजी राजकारणाचे सुरू झालेले खेळ थांबत नसल्याने आता सर्वसामान्य नागरीकांना उबग येत आहे.
नाशिक-राजकारण कुठे आणि किती करावे याला ही मर्यादा आहेत. परंतु सध्या नाशिक महापालिकेच्या निवडणूकांच्या तोंडावर सर्वांनीच तीलांजली दिल्याचे दिसत आहे. डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयातील ऑक्सीजन गळतीनंतर सुरू झालेले आरोप प्रत्यारोप थांबण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे आता प्रकरण गंभीर होत चालले आहे. रूग्णांना दिलासा देण्याऐवजी राजकारणाचे सुरू झालेले खेळ थांबत नसल्याने आता सर्वसामान्य नागरीकांना उबग येत आहे.
अर्थात, असे राजकारण केवळ स्थानिक पातळीवर सुरू आहे अशातला भाग नाही. राज्य आणि केंद्रातील भिन्न सरकारांमुळे सध्या जे मदत आणि अत्यावश्यक उपचार सुविधा आणि वाढणारे रूग्ण यावरून जे राजकारण सुरू आहे. तेच आता स्थानिक पातळीवर देखील दिसत आहे.
गेल्या महिन्यात २१ एप्रिल रोजी महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्सीजन गळती झाली. त्यात २२ जणांचे मृत्यू झाले. त्यामुळे थेट महापालिकेतील सत्ता म्हणून भाजपावर दोषारोप करण्यापासून महापौरांचा राजीनामा मागण्यापर्यंत विरोधकांनी राजकारण केले. वास्तविक, महापालिकेतील ठेके हे केवळ सत्तारूढ पक्षाचे नेते देतात असे नाही तर ज्या स्थायी समितीत ठेक्यांना अंतिम रूप दिले जाते. तेथे सर्वपक्षीय सदस्य असतात. स्थायी समितीत कोणताचा पक्ष नसतो, सर्व एक दिलाने काम करीत असतात. अशावेळी ठेकेदारीवरून सत्तारूढ भाजपाला धारेवर धरणारे नेते मग स्थायी समितीत सदस्य असणाऱ्या आपल्या सदस्यांना जाब का विचारत नाहीत हा खरे तर प्रश्न आहे.
ऑक्सीजन गळती प्रकरणावरील राजकारण थांबत नाही तोच देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दाैऱ्यावरून राजकारण सुरू झाले. बिटको रूग्णालयात त्यांनी भेट घेऊन आढावा देण्याचा प्रयत्न केला. त्यावर सेना आणि राष्ट्रवादीने प्रश्न उपस्थित केले. त्यावरूनही मग सेना भाजपा आणि राष्ट्रवादीत जुंपली. आधीच नागरीक कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अत्यंत त्रस्त आहे. खासगी रूग्णालयात बेड मिळत नाही, ऑक्सीजन मिळत नाही आणि रेमडेसिवरचा ताबा प्रशासनाने घेऊन सुध्दा काळ्याबाजारात खरेदी करावी लागत आहे. अशावेळी नागरीकांना अशा प्रकारचे राजकारण अपेक्षीत नाही. किंबहूना त्यांना त्याकडे लक्ष देण्यास देखील वेळ नाही. त्यांना नगरसेवक, राजकीय पक्षांकडून सध्या कोरोना बाबत उपचारात मदत हवी आहे, आणि त्यासाठी ते झगडत आहे. अत्यंत संकट काळात जो मदत देईल तो आपला अशी त्यांची भूमिका आहे. आणि तेच भविष्यातील राजकारण आणि निवडणूकीत उपयुक्त ठरणार आहे, राजकीय आरोप प्रत्यारोप नव्हे!