नाशिक: यंदाच्या शैक्षणिक सत्रासाठी खासगी तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी ऑनलाईनबरोबरच लाईव्ह अध्यापनाची तयारी केलेली असताना दुसरीकडे महापालिका शाळांमधील शिक्षक सोमवारी विद्यार्थ्यांच्या घरी पोहोचून त्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल हाताळण्याचे धडे देताना दिसले.
शासनाच्या आदेशानुसार मंगळवारी (दि.१५) ऑनलाईन शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. त्यानुसार शहरातील सर्वच शाळांनी सज्जता केली आहे. मात्र, महापालिका शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षणाबाबत मर्यादा असल्याने ऑनलाईन वर्ग सुरू होण्याच्या एक दिवस आगोदर जेल रोड येथील मनपा शाळा क्रमांक ५६ चे शिक्षक झोपडपट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांना ऑनलाईन वर्गाची माहिती देत होते. मोबाईल लिंक कशी काढावी, तसेच ऑनलाईन वर्ग ॲटेन्ड करण्याबाबत विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना धडे देण्यात आले. मागील संपूर्ण वर्षात विद्यार्थ्यांना पूर्णपणे शाळेत जाता आले नाही आता हे विद्यार्थी पुढच्या वर्गात गेले असून त्यांना याबाबतचा अभ्यासक्रम आणि नोटस् घेण्यासाठीची तोंडी माहिती देण्यात आली.
खासगी तसेच इंग्रजी शाळांच्या तुलनेत मनपा शाळेतील विद्यार्थी कोरोनाच्या काळात शाळांशी फारसे जोडले गेले नसल्याने त्यांचे मागील वर्ष घरातच गेले. आता नव्या शैक्षणिक वर्षासाठी त्यांना ऑनलाईन आणण्यासाठी शिक्षकांची धडपड सुरू झाली आहे. बहुतांश झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे विद्यार्थी असल्याने त्यांना मोबाईल वापरावा लागणार असून पालकांची देखील मदत महत्त्वाची असल्याबाबतची जनजागृती शिक्षकांनी केली. ऑनलाईन शिक्षणासाठी वातावरणनिर्मितीसाठी शिक्षकांनी पालकांशी संवाद साधला. मुलांना मोबाईल उपलब्ध करून देण्याबरोबरच रिचार्जबाबत दक्षता घेण्याच्या सूचना केल्या.
--इन्फो--
अनेक अडचणही आल्या समोर
अनेकांकडे तर मोबाईलच उपलब्ध नाही तर काहींच्या घरात एकच मोबाईल असल्याने त्यांची गैरसोय होणार आहे. काहींकडे ॲन्ड्रॉईड मोबाईलदेखील नसल्याच्या तक्रारी समेार आल्या आहेत तर काही पालकांनी मोबाईल रिचार्जचा मुद्दाही मांडला. रेंज मिळत नसल्याच्या अडचणीदेखील निदर्शनास आणून दिल्या.
--कोट--
ऑनलाईन शिक्षणाबाबत शिक्षकांना सूचना करण्यात आलेल्या आहेत. प्रत्यक्ष अध्यापनाच्यावेळी निर्माण होणाऱ्या अडचणीतून मार्ग काढून शैक्षणिक सत्र सुरूच राहील याबाबतची दक्षता घेतली जाणार असून प्रसंगी वाड्या, वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष शिकविण्याची वेळ आली तर त्याचाही विचार केला जाईल. शासनाच्या नियमांचे पालन करून अध्यापन सत्र सुरू होणार आहे.
- सुनीता धनगर, प्रशासन अधिकारी, मनपा शिक्षण मंडळ.
(फोटो: १४पीएचजेयु६२)
===Photopath===
140621\14nsk_39_14062021_13.jpg
===Caption===
ऑनलाईन शिक्षणाबाबत पालकांना माहिती देतांना मनपा शाळेतील शिक्षक