बससेवेला लवकरच ‘डबल बेल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:11 AM2021-06-06T04:11:30+5:302021-06-06T04:11:30+5:30
दरम्यान, बैठकीत अधिकृत मुहूर्त काहीही ठरला तरी किमान पाच मार्गांवर बससेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त कैलास ...
दरम्यान, बैठकीत अधिकृत मुहूर्त काहीही ठरला तरी किमान पाच मार्गांवर बससेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
नाशिक महापालिकेने २०१८ मध्ये शहर बस वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कंपनीने काम सुरू झाले असले तरी अनेक अडचणी येत गेल्याने बससेवा लांबत गेली. गेल्यावर्षी २६ जानेवारीस महापालिकेने बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी शासनाकडून बस संचलनाचा परवानाच मिळाला नसल्याचे आढळले होते. त्यानंतर परवाना मिळाला आणि कंपनीच्या बसेसदेखील मार्च महिन्यात दाखल झाल्या. त्याचे पासिंगही झाले. परंतु कोरोनाचे संकट उद्भवले आणि पुन्हा हा विषय मागे पडला. शासनाचा परवाना येऊनदेखील महापालिकेच्या बससेवेसाठी दरनिश्चितीसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक होत नव्हती. अखेरीस गेल्या आठवड्यात त्यांनी दोन किलोमीटरला दहा रुपये याप्रमाणे दर आकारणीस मान्यता दिली. त्यामुळे आता बऱ्यापैकी बससेवेला चालना मिळण्याची शक्यता आहे.
एकीकडे बससेवेची संपूर्ण तयारी झाली असताना दुसरीकडे शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. त्यातच राज्य शासनाने आता मिशन अनलॉक सुरू केले आहे. बाधितांच्या संख्येच्या निकषावर सोमवारपासून राज्यात अनेक ठिकाणी अनलॉक करण्यात येणार आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातदेखील शिथिलता मिळणार असल्याने बससेवा सुरू करण्याची तयारी महापालिकेने केली आहे.
इन्फो...
गेल्यावर्षी बससेवेची तयारी करताना महापालिकेने नऊ मार्ग निश्चित केले होते. त्यावर प्रथम बससेवा सुरू होणार होती, मात्र आता पाच मार्ग निवडण्याची शक्यता असून, त्यावर ही सेवा चाचणी स्वरूपात सुरू करण्यात येणार आहे.
कोट...
महापालिकेने बससेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. बुधवारी (दि.९) बैठक घेण्यात येणार असून, त्यात निर्णय होणार आहे. सुरुवातीला पाच ते सहा मार्गांवर बससेवेची चाचणी घेण्यात येईल आणि प्रवाशांचा प्रतिसाद असलेल्या मार्गांवर पन्नास बस सुरू करण्याचे नियोजन आहे.
- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका