मालेगावी आॅनलाइन शिक्षणाबाबत साशंकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 11:10 PM2020-06-05T23:10:25+5:302020-06-06T00:00:07+5:30
आॅनलाइन शिक्षण मालेगाव शहरात व तालुक्यात कितपत यशस्वी होईल याबाबत पालक आणि शिक्षकांमध्येच संभ्रम असून, संबंधितांनी मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.
पाटणे : आॅनलाइन शिक्षण मालेगाव शहरात व तालुक्यात कितपत यशस्वी होईल याबाबत पालक आणि शिक्षकांमध्येच संभ्रम असून, संबंधितांनी मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे. आज संपूर्ण जग कोरोना महामारीच्या संकटातून जात आहे. दरवर्षी जून महिन्यात सुरू होणारी शाळा यावेळी मात्र कधी सुरू होईल याची शाश्वती नाही. कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रात मोठे आव्हान उभे राहिले आहे. विद्यार्थी घरी आणि प्रशासन म्हणते त्यांना आॅनलाइन शिक्षण द्या. पालकांच्याही अशाच काही अपेक्षा आहेत. मुले तंत्रज्ञानाचा वापर करून अभ्यास करतील याचे पालकांना-देखील कौतुक वाटेल; पण किती पालकांकडे स्मार्ट फोन आहेत हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.
मालेगाव हे शहर पूर्व व पश्चिम दोन विभागात विखुरलेले आहे. शिक्षणाची माध्यम वेगवेगळी आहेत. विद्यार्थिसंख्या अधिक आहे. मात्र ८० टक्के पालक लघु व्यवसाय व मोलमजुरी करून पोट भरणारे आहेत. म्हणून त्यांच्याकडे स्मार्ट फोन असेल असे नाही. असला तरी त्याची क्षमता किती आहे हे महत्त्वाचे आहे. शहरी व ग्रामीण भागातील पालकांना तंत्रज्ञानाविषयी फारशी माहिती नाही. त्यामुळे आॅनलाइन शिक्षणात अनेक मर्यादा येऊ शकतात.
असे असले तरी, नवे तंत्रज्ञान नाकारून चालणार नाही. शिक्षक व विद्यार्थी यांना काळानुरूप स्वत: बदल करावा लागणार आहे. नवीन गोष्टी शिकाव्या लागतील. पुढे परिणाम काय होईल हे पाहण्यापेक्षा कृतीला सुरुवात करावी लागेल.
किती विद्यार्थी समूहात सहभागी होतात ते किती समरस होऊन अध्ययन करतात हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. कारण जेव्हा शाळा सुरू असते तेव्हा काही विद्यार्थी होमवर्क नीट करत नाही. शिक्षक चौकशी करतात तेव्हा उडवाउडवीची उत्तर देऊन खोटं बोलतात. आता मात्र परीक्षण कसं करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे कमी वयात मोबाइल हातात येईल. गुपचूप न सांगता सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहणे. शाळेत जशी शिस्त व नियमांचे पालन होते ते होणार नाही, असे शिक्षकांना वाटते आहे.
शिक्षक विद्यार्थी समोरासमोर असल्यावर शिक्षण परिणामकारक होते. आॅनलाइन शिक्षणाने ज्ञान मिळेल; पण संस्कार मिळणार नाही. शिक्षणातून बौद्धिक, भावनिक व क्रियात्मक विकास झाला पाहिजे. आॅनलाइन शिक्षण आवश्यक आहे जसे दैनंदिन जीवनात जेवणामध्ये भाजीपोळीबरोबर चटणी, पापड हे चव देतात तसे व्हिडीओ क्लिप, सीडीज, ब्लॉगस्पॉट, आॅडिओ माहितीपट इ. आॅनलाइन शिक्षणात महत्त्वाचे आहेत. औपचारिक शिक्षणातून देशाचा आदर्श नागरिक घडवायचा असतो.
श्यामच्या आईची गोष्ट सांगताना गहिवरून आलेल्या शिक्षक व विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील पाणी एकमेकांना वर्गातच दिसेल आॅनलाइन नाही दिसणार. आॅनलाइन शिक्षणातून विद्यार्थी ज्ञान मिळवेल; पण अनुभव नाही. श्रीमंताची मुलं शिक्षण घेतील, पण गरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. कोरोना संकट किती काळ राहील सांगता येत नाही. पालकांचे काम सुटले, पैसा नाही त्यामुळे पालकांचा स्मार्ट फोनला रिचार्ज मारून देणाऱ्या शाळेत प्रवेशासाठी कल राहाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आॅनलाइन शिक्षणाची गरज आहे; पण औपचारिक नाही तर आजच्या शिक्षण पद्धतीला सपोर्ट म्हणून आवश्यक आहे. कोरोनाची परिस्थिती कायम राहणार नाही. मात्र आपल्याला नवीन गोष्टी शिकायला संधी मिळाली आहे. म्हणून नकारात्मक विचार सोडून आॅनलाइन शिक्षणाबाबत सकारात्मक गोष्टी अंगीकारायला हरकत नाही.
- राजेंद्र शेवाळे, शिक्षक, केबीएच विद्यालय, मालेगाव कॅम्प