रातोरात काढले : पोलिसांकडून चौकशी सुरू भिडे, एकबोटे यांचे पोस्टर्स गायब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:39 AM2018-01-13T00:39:00+5:302018-01-13T00:40:54+5:30
नाशिक : कोरेगाव-भीमा येथील जातीय दंगल प्रकरणी गुन्हा दाखल झालेले शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे व हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे हे दोघे ‘वॉन्टेड’ असल्याचे शहरात झळकलेले पोस्टर्स गुरुवारी रातोरात काढून टाकण्यात आले.
नाशिक : कोरेगाव-भीमा येथील जातीय दंगल प्रकरणी गुन्हा दाखल झालेले शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे व हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे हे दोघे ‘वॉन्टेड’ असल्याचे शहरात झळकलेले पोस्टर्स गुरुवारी रातोरात काढून टाकण्यात आले असून, ते कोणी लावले व कोणी
काढले याविषयीचे गूढ वाढले आहे. राज्यात सामाजिक सलोखा निर्माण झालेला असताना अशा प्रकारे पुणे पोलिसांच्या नावाचा वापर करून ठिकठिकाणी भिडे, एकबोटे यांचे पोस्टर्स लावून शांतता भंग करण्याचा प्रयत्न समाजकंटकांनी सुरू केल्याने त्याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.
गुरुवारी नाशिक शहरातील जुने मध्यवर्ती बसस्थानक, ठक्कर बाजार बसस्थानक, शालिमार चौक, अशोकस्तंभ, नाशिकरोड रेल्वेस्थानक, प्रवासी वाहतूक करणाºया एसटी बसेसला मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे यांचे छायाचित्र असलेले पोस्टर्स लावून त्यात ते ‘वॉन्टेड’ असल्याचे नमूद करण्यात आले होते. पोस्टर्सवर संपर्कासाठी पुणे पोलिसांचे दूरध्वनी क्रमांक देण्यात आल्याने जणू काही पोलिसांनीच सदरचे पोस्टर्स लावले आहेत, असे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पुणे पोलिसांनी पोस्टर्सचा इन्कार करीत पुणे पोलिसांकडून अशाप्रकारे कोणतेही पोस्टर्स लावण्यात आले नसल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीस सांगितले. या पोस्टर्समुळे शहरात मात्र खळबळ उडाली होती. स्थानिक पोलीस प्रशासनाला मात्र याची कोणतीही माहिती नव्हती. यानिमित्ताने पोलिसांची कुचकामी यंत्रणाही समोर आली. शहराच्या मध्यवर्ती भागात पोस्टर्स लावूनही स्थानिक पोलिसांना याची भणक लागली नाही, हे विशेष.
कोरेगाव-भीमा प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू असून, भिडे व एकबोटे यांच्याविरुद्ध ठिकठिकाणी पोलिसांत तक्रार दाखल असल्याने त्याची स्वतंत्र चौकशी पोलीस खात्याकडून सुरू आहे. असे असताना दोघेही वॉन्टेड असल्याच्या पोस्टर्समुळे पुन्हा सामाजिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून केला जात असल्याची बाब गंभीर असताना, नाशिक पोलीस याविषयी अनभिज्ञ आढळून आले. सदर प्रकाराची शहरात कुजबुज सुरू झाल्यानंतर गुरुवारी मध्यरात्रीच शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले पोस्टर्स काढून घेण्यात आले. याचाही पोलिसांना पत्ता लागला नाही.
पोलिसांकडून चौकशी
गुरुवारी यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शहरात या घटनेबाबत कुजबुज सुरू झाली होती. मात्र तत्पूर्वीच अज्ञात व्यक्तींनी सदरचे पोस्टर्स फाडून टाकले. या घटनेमध्ये संशयितांनी पोस्टर्स लावणे आणि ते काढून घेण्यापर्यंत मजल मारली असतानाही स्थानिक पोलीस यंत्रणेला कोणतीही माहिती नव्हती. या घटनाक्रमामुळे पोलीस यंत्रणा सावध झाली असून, अचानक पोस्टर्स लावणे व ते काढून घेणे या दोन्ही बाबी संशयास्पद असून, नाशिक पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त विजय मगर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.