नाशिक : शहरापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या दुडगावामध्ये वनविभागानेबिबट्याचा वाढता संचार लक्षात घेता नागरिकांच्या मागणीवरुन पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात गुरुवारी (दि.७) पहाटेच्या सुमारास एका चार वर्षांचा बिबट्या (नर) जेरबंद झाला. यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
त्र्यंबकेश्वर रोडवरील वासाळीगावाच्या जवळ सातपुर वनपरिमंडळात असलेल्या दुडगाव शिवारात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात होते. नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी अर्जाद्वारे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांच्याकडे केला होता. त्यानुसार वनपाल ओंकार देशपांडे, वनरक्षक सचिन आहेर, साहेबराव महाजन यांनी मंगळवारी रंगनाथ बेजेकर यांच्या शेताच्या परिसरात बिबट्याच्या पाऊलखुणा दिसून आल्याने तेथे पिंजरा तैनात करण्यात आला होता. गुरुवारी पहाटे बिबट्या भक्ष्याच्या शोधात भटकंती करत असताना पिंजऱ्यात अडकला. याबाबत सकाळी सहा वाजेच्या सुमारास नागरिकांनी देशपांडे यांनी माहिती दिली. माहिती मिळताच वन कार्यालयातील वन्यप्राणी पिंजरा वाहतूक करणारे वाहन घेऊन वाहनचालक प्रवीण राठोड यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. बिबट्या जेरबंद झालेला पिंजरा वाहनात टाकून त्वरित घटनास्थळावरुन सुरक्षितरित्या हलविण्यात आला.